मुंबई : मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात दोन अजगर दिसल्याने रहिवाशांमध्ये घबराट उडाली होती. मात्र पोलिस कॉन्स्टेबल आणि सर्पमित्रांनी 9 फुटी अजगराला पकडलं, तर दुसरा निसटला.
बीकेसीमध्ये मिठी नदीच्या पुलाजवळ रात्रीच्या वेळी दोन अजगर दिसले होते. सिद्धिविनायकाला रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या काही भाविकांना अजगर रस्त्याच्या कडेले दिसले. त्यांनी तातडीने पोलिस कंट्रोलला फोन करुन याविषयी माहिती दिली.
पोलिस कॉन्स्टेबल, सर्पमित्र आणि एनजीओच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अजगराला पकडण्याचा प्रयत्न केला. नऊ फूट लांबीच्या अजगराला जेरबंद करण्यात यश आलं, तर 12 फुटांचा अजगर अंधार आणि खारफुटी जंगलात निघून गेला.
अजगर हा बिनविषारी साप आहे, मात्र त्यांची लांबी पाहून अनेक जण घाबरतात आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतात, असं सर्पमित्रांनी सांगितलं. कधी कधी हे साप रस्त्यावर येऊन वाहनाखाली चिरडून मृत्युमुखी पडतात.
अंबरनाथमध्ये कालच बाईकच्या सीट कव्हरमध्ये धामण आढळल्याने खळबळ उडाली होती. सुदैवाने सर्पमित्रांनी धामण पकडून नागरिकांना दिलासा दिला होता.