तिरुवअनंतपुरम : टीम इंडियाने थिरुवनंतरपुरममधल्या आठ-आठ षटकांच्या सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव केला. तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करत न्यूझीलंडवर मात केली.


फिरकीपटू यजुवेंद्र चहलच्या षटकाने सामन्याला कलाटणी दिली. 18 चेंडूत 32 धावांची आवश्यकता होती, तेव्हा चहल गोलंदाजीसाठी आला. मात्र त्याने या षटकात केवळ 3 धावा दिल्या आणि न्यूझीलंडचं विजयाचं स्वप्न धुसर केलं.

चहलने टाकलेल्या सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केवळ एक धाव काढता आली. त्यानंतरचा दुसरा आणि तिसरा चेंडू निर्धाव टाकला. स्ट्राईकवर असलेल्या ग्रँडहोमने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. चहलने पाचवा चेंडू निर्धाव टाकला आणि अखेरच्या चेंडूवर एक धाव दिली.

चहलने न्यूझीलंडचा आत्मविश्वास या षटकात कमी केला होता. त्यानंतर आलेल्या जसप्रीत बुमराच्या षटकात 12 चेंडू असताना 29 धावांची आवश्यकता होती. बुमरा आणि अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने जबाबदारी चोखपणे पार पाडत भारताला विजय मिळवून दिला.

संबंधित बातमी : श्वास रोखले होते, कोहली सीमारेषेजवळ होता, धोनी सूत्रं सांभाळत होता!