नवी दिल्ली : इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याने दिल्ली विमानतळावर प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर इंडिगोने माफी मागत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढलं आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

इंडिगोचा ग्राऊंड स्टाफ आणि एका प्रवाशामध्ये वाद झाला. याचं रुपांतर हाणामारीत झालं. या घटनेचा व्हिडिओही समोर आला होता. 15 ऑक्टोबर रोजी घडलेली ही घटना आहे. राजीव कतियाल हे बसची वाट पाहत उभे होते, तेव्हा ही घटना घडली.

https://twitter.com/ravirajadsul/status/928075969025359872

इंडिगो कर्मचाऱ्याने राजीव कतियाल यांना बेदम मारहाण केली. इंडिगोच्याच दुसऱ्या कर्मचाऱ्याने या घटनेचा व्हिडिओ शुट केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक वाद होता, जो नंतर आपापसातच मिटवण्यात आला.

इंडिगोने घटनेची दखल घेत तातडीने या कर्मचाऱ्याला बडतर्फ केलं आणि राजीव कतियाल यांची माफी मागितली. नागरी उड्डाण मंत्री जयंत सिन्हा यांनीही इंडिगोकडून या घटनेबाबत स्पष्टीकरण मागत घटनेचा निषेध केला आहे.