लंडन : 36 कसोटी सामन्यांचं नेतृत्त्व केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्यांदाच एका डावाने पराभव स्वीकारावा लागला. लॉर्ड्समध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला एक डाव आणि 159 धावांनी धूळ चारली.

चुकीच्या संघासोबत मैदानात उतरल्यामुळे हा पराभव झाला, असं स्पष्टीकरण विराट कोहलीने दिलं आहे. भारतीय संघ पहिल्या डावात 107 धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात सात बाद 396 धावांवर डाव घोषित केला. भारताचे दोन्ही फिरकीपटू या सामन्यात समाधानकारक कामगिरी करु शकले नाहीत.

कुलदीप यादव 10 षटकंही गोलंदाजी करु शकला नाही, तर अश्विनने 17 षटकांमध्ये 68 धावा दिल्या.

पावसानंतरही भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरला. त्यामुळे या संघ निवडीवर टीका झाली होती. पराभवानंतर पाहिलं तर आम्ही चुकीच्या संघासोबत उतरलो होतो. टीम अगोदरच निवडली होती, त्याचा परिणाम भोगावा लागला, असं विराट कोहली सामना संपल्यानंतर म्हणाला.

गेल्या पाच सामन्यांमधला हा सर्वात वाईट पराभव आहे. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, ते पाहता पराभव निश्चित होता, असं विराट म्हणाला.

विराटने इंग्लंडचंही कौतुक केलं. शिवाय तिसऱ्या कसोटीसाठी आता पाच दिवसांचा वेळ आहे. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत पुनरागमनासाठी पूर्ण तयारीनिशी उतरेल, असा विश्वास विराटने व्यक्त केला.