मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने सन 2018-19 साठी विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या मुक्त विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीमध्ये देशातील मुंबई दूर आणि मुक्त अध्ययन (आयडॉल) संस्थेसह 34 संस्थांची नावेच नसल्याने यांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांना नोकरी करून शिक्षण घेता यावे यासाठी अनेक विद्यार्थी या संस्थेत प्रवेश घेतात. मात्र, अनेक संस्थांची नावे या यादीत नसल्याने ज्या विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आहे, त्यांचं नेमकं काय होणार? त्यांच्या पदवीचं नेमकं काय होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

यूजीसीच्या यादीत नसलेली महत्त्वाची नावं

मुंबई दूर आणि अध्ययन संस्था (आयडॉल)

रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठ

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यालय

भारती विद्यापीठ

याशिवाय,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील 38 पैकी फक्त 17 अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे.

एसएनडीटी मुक्त विद्यापीठाचे फक्त तीन अभ्यासक्रम मान्यता प्राप्त ठेवले आहेत.

विद्यापीठांना भूमिका मांडण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी

मुंबई विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन रखडल्याने हा फटका बसल्याच बोललं जातंय. शिवाय अनेक मुक्त विद्यापीठात यूजीसीकडून मान्यता न घेता अभ्यासक्रम सुरु केल्याने ते यूजीसी नियमानुसार रद्द करण्यात आले आहेत. याबाबत मुक्त विद्यापीठांना आपली भूमिका मांडण्यासाठी 30 दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतरच या विद्यापीठाच्या मान्यता रद्द करायच्या का? याबाबत निर्णय यूजीसी घेईल.

यूजीसी यादीत मुक्त विद्यापीठांची नावं न आल्याने, शिवाय अभ्यासक्रम बंद करणार असल्यामुळे विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कारण, असं झाल्यास अनेकांनी आपली पदवी या मुक्त विद्यापीठातून घेतली आहे, त्यामुळे त्याला बाहेर काहीच महत्त्व राहणार नाही का, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.