फ्लोरिडा : अमेरिकेतील लोक झोपेतच होते, तेव्हा नासाचं पार्कर सोलार प्रोब हे यान सूर्याच्या दिशेने झेपावलं. लाखो डिग्री तापमानात सूर्याच्या जवळ जाऊन अभ्यास करण्यासाठी नासाने हे यान पाठवलं आहे. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार रात्री 3.31 वाजता हे यान लाँच करण्यात आलं.

फ्लोरिडातील कॅनेडी स्पेस सेंटरमधून एलियान्स डेल्टा-4 या रॉकेटच्या माध्यमातून पार्कर सोलार प्रोबच्या प्रवासाला सुरुवात झाली. या यानाला लाखो डिग्री तापमान आणि रेडिएशनचा सामना करावा लागणार आहे. तापमानापासून बचावासाठी यानाच्या समोर कार्बन कंपोजिट 4.5 इंच आकाराची शील्ड लावण्यात आली आहे. यामुळे मशिन्स सुरक्षित राहतील.

या यानाचं नाव शास्त्रज्ञ डॉ. युगेन पार्कर यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. पार्कर यांनी पहिल्यांदा 1958 मध्ये सूर्यावर जोरात उष्ण वारे वाहत असल्याबाबत चर्चा केली होती.

कसं आहे पार्कर सोलार प्रोब?

पार्कर सोलार प्रोबचं वजन 15 पाऊंड असून आकार एका कारसारखा आहे. यान बनवण्यासाठी नासाने 100 अब्जांपेक्षा जास्त खर्च केला आहे. यामध्ये पॉवर सप्लायसाठी सोलार पॅनल लावण्यात आले आहेत. अंतराळात यानाचा वेग जवळपास 430000 मैल प्रति तास असेल.

यानाची लांबी एकूण 62.7 फूट आहे. नासाचं हे यान सूर्यावर जाईल तेव्हा सूर्य पृथ्वीवरुन दिसतो, त्यापेक्षा 25 पट मोठ्या आकाराचा दिसेल. सूर्यावर होणाऱ्या हालचालींचा या यानाच्या माध्यमातून अभ्यास करण्यात येणार आहे.

सूर्याच्या एवढं जवळ जाणारं पहिलंच यान

सूर्याच्या एवढं जवळ जाणारं हे जगातलं पहिलं यान आहे. सूर्याच्या जवळ जाऊनही सूर्य ते यान हे अंतर जवळपास 40 लाख मैल असेल. कारण, यापेक्षा पुढे जाणं सध्या तरी शक्य नाही.

सूर्याच्या चौफेर ऊर्जेचे घेराव आहेत, ज्याला कॉरोना म्हटलं जातं. यामध्ये कोणत्याही वस्तूला क्षणात जाळण्याची क्षमता असेल. सोलार पार्कर प्रोबला हा सामना करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलं आहे.

नासा आणि संपूर्ण जगाचं या यानाकडे लक्ष आहे. सूर्याच्या एवढ्या जवळ जाऊन अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांमध्ये नेहमीच उत्साह राहिलेला आहे.