सेन्चुरियन : दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकला मनगटाच्या दुखापतीमुळे उर्वरीत वन डे आणि ट्वेंटी ट्वेन्टी मालिकेतून संघाबाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या या मालिकेत एबी डिव्हिलियर्स आणि फाफ ड्यू प्लेसीपाठोपाठ  दक्षिण आफ्रिकन संघाला बसलेला हा तिसरा धक्का आहे.


सेंच्युरियनच्या दुसऱ्या वन डेत फलंदाजी करताना डी कॉकच्या मनगटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला दोन ते चार आठवडे खेळता येणार नसल्याचं दक्षिण आफ्रिकन संघव्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान तिसरी वन डे केपटाऊनमध्ये खेळवण्यात येणार आहे. पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने सहा सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र यजमान दक्षिण आफ्रिकेला पराभवासोबत खेळाडूंच्या दुखापतीचंही ग्रहण लागलं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसीला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे या मालिकेदरम्यान यजमान संघाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. याआधी एबी डिव्हिलियर्सला बोटाच्या दुखापतीमुळे तीन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर आता डी कॉकही उर्वरित सामन्यांतून बाहेर पडला आहे.

फाफ डू प्लेसिसच्या ऐवजी दक्षिण आफ्रिका संघाची धुरा एडिन मार्करमच्या खांद्यावर असेल, तर फरहान बेहरदीनला संघात स्थान देण्यात आलं आहे. शिवाय डिव्हिलियर्सच्या जागी हेइनरिक क्लासेनचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची धुरा आता हाशिम आमला, जेपी ड्युमिनी आणि डेव्हिड मिलर यांच्या खांद्यावर असेल.