मेल (मालदीव) : मालदीवमध्ये राजकीय संकट ओढावलं आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळण्यास नकार दिल्यानंतर 15 दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. सर्व नागरिकांचे मुलभूत अधिकार रद्द करण्यात आले आहेत.

मालदीवमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्ववत होत नाही, तोपर्यंत कुणीही मालदीवला जाऊ नये, असं आवाहन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.

आणीबाणीची वेळ कशामुळे ओढावली?

मालदीवच्या सुप्रीम कोर्टाने काही राजकीय कैदी आणि अटक केलेल्या खासदारांना सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र राष्ट्रपती यमीन यांनी हे आदेश पाळण्यास नकार दिला. त्यानंतर मालदीवमधील जनता यमीन यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली.

भारतीयांना खबरदारी घेण्याचं आवाहन

मालदीवमधील भारतीय प्रवाशांना सुरक्षेची काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये आणि गर्दीच्या ठिकाणी उभं राहू नये, याबाबतही कळवण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

रविवारीच मालदीवच्या संसदेला लष्कराने सील केलं होतं. शिवाय विरोधी पक्षातील दोन खासदारांना अटकही करण्यात आली होती.