कोलकाता : अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानच्या गोलंदाजीवर विकेटकीपिंग करणं कठीण आहे, असं टीम इंडियाचा कसोटी संघाचा विकेटकीपर रिद्धीमान साहाचं म्हणणं आहे. आयपीएलमध्ये रिद्धीमान साहा सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर साहा बोलत होता. यावेळी त्याने राशिद खानच्या गोलंदाजीचंही कौतुक केलं. तो पूर्ण आत्मविश्वासाने खेळतो आणि खेळाचा आनंद घेतो, असं साहा म्हणाला.
राशिद खान सध्या टी-20 फॉरमॅटमध्ये जगातला अव्वल गोलंदाज आहे. त्याने सर्वाधिक कमी सामन्यांमध्ये 100 विकेट घेण्याचा विक्रमही पूर्ण केला आहे.
''अनेक दिवसांनंतर राशिदसारख्या गोलंदाजासमोर विकेटकीपिंग करण्याची संधी मिळाली आहे. हा चांगला अनुभव आहे. त्याच्याकडे चांगला वेग आणि टर्न आहे,'' असंही साहा म्हणाला.
''आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, अमित मिश्रा किंवा कुलदीप यादव यांच्यासमोर विकेटकीपिंग केली आहे. मात्र राशिद खानच्या गोलंदाजीवर विकेटकीपिंग केल्यामुळे आत्मविश्वास आणखी वाढतोय, असं साहाने सांगितलं.