Wrestlers Protest: गेल्या बारा दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतर (Jantar-Mantar) या ठिकाणी कुस्तीपटुंचे (Wrestler Protest) आंदोलन सुरु आहे. आज शुक्रवारी (5 मे) रोजी या आंदोलनाचा 12 वा दिवस आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. 3 मे रोजी आंदोलनकर्त्यांमध्ये आणि दिल्ली पोलिसांमध्ये रात्री उशीरा वाद झाला. तसेच 'जर आता न्याय (Justice) मिळाला नाही तर आम्ही आम्हाला मिळालेली पदकं देखील परत करु', अशी देखील भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. 


ब्रिजभूषण सिंह (Brijhushan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप होऊनही त्यांच्यावर मोदी सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशातील महिला कुस्तीपटू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, 18 जानेवारी 2023 रोजी कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह 30 कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले होते. आंदोलनात सामील झालेल्या सात कुस्तीपटूंनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. याची चौकशी करण्यासाठी दोन समित्याही स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यावेळी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून कुस्तीपटूंनी विरोध संपवला होता. मात्र, याप्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने भारतीय कुस्तीपटूंमध्ये नाराजी आहे. 


कुस्तीपटू आणि दिल्ली पोलिसांमध्ये संघर्ष 


जंतर-मंतर याठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनावर पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. 3 मे रोजी या आंदोलन कर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांसारख्या कुस्तीपटूंना या संघर्षात दुखापत देखील झाली. तसेच या कुस्तीपटूंबरोबर गैरवर्तन करत असल्याचा आरोप या कुस्तीपटूंनी केला आहे. 


सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय? 


सर्वोच्च न्यायालयाने या महिला कुस्तीपटूंनी उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. गुरुवारी 4 मे रोजी झालेल्या सुनावणीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, अल्पवयीन आंदोलन करत असणाऱ्या मुलींना सुरक्षा देण्यात आली आहे. न्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी कोणताही निर्णय न देता त्यावेळी न्यायालयाचे कामकाज आटोपले. यावर कुस्तीपटूंनी कोणत्याही प्रकारचा गोंधळ घातला नाही. त्यांनी सुप्रिम कोर्टाचा निर्णय त्यांना मान्य असल्याचं या आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी म्हटलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


जंतर-मंतरवर 'मिड नाईट ड्रामा'; पोलिसांकडून जीवघेण्या हल्ला झाल्याचे कुस्तीपटूंचे आरोप, पोलीस म्हणतात, "किरकोळ वाद, परिस्थिती नियंत्रणात"