मुंबई : भारताची खरीखुरी 'दंगल'गर्ल अर्थात महिला कुस्तीपटू बबिता फोगट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सहकारी कुस्तीपटू विवेक सुहागसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची घोषणा बबिताने सोशल मीडियावरुन केली. वडिलांनी आशिर्वाद देत ग्रीन सिग्नल दिल्याचं बबिताने म्हटलं आहे.


वडील महावीर फोगट यांचे आशीर्वाद घेतानाचा फोटो बबिताने ट्वीट केला आहे. 'माझ्या बापूंकडून तुला आशीर्वाद मिळाल्याने आपल्या नात्याला अधिकृत मान्यता मिळाली आहे. आता दिलवाले दुल्हनिया घेऊन जाणार' अशा आशयाचं ट्वीट बबिताने केलं आहे.


वर्ष अखेरीस बबिता आणि विवेक लग्नबंधनात अडकतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. बबिताने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं होतं.

आमीर खानने कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या कन्या गीता आणि बबिता यांच्या आयुष्यावर आधारित 'दंगल' या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर फोगट बापलेकी घराघरात परिचित झाल्या.