लंडन : आयसीसी विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात बांगलादेशच्या शाकिब अल हसनने विश्वविक्रमाला गवसणी घातली. शाकिब एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा आणि 250 विकेट्सचा टप्पा सर्वात वेगाने पार करणार खेळाडू ठरला आहे.


शाकिबने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 75 धावांची शानदार खेळी केली. यासोबत विकेटही घेतली. शाकिबने 20 व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या एडेन मरक्रमला बाद करुन विश्वविक्रमाला गवसणी घातली.


शाकिबचा आता पाकिस्तानच्या अब्दुल रज्जाक, शाहिद आफ्रिदी, श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिस यांच्या पंक्तीत समावेश झाला आहे. या पाच खेळाडूंच्या तुलनेत शाकिबने ही कामगिरी सर्वात वेगात केली आहे. त्यामुळे वेगवान ही कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शाकिब सर्वात वरच्या स्थानावर आहे.


अष्टपैलू खेळाडूंची यादी


अब्दुल रज्जाक - 269 विकेट- 5080 धावा


सनथ जयसूर्या - 323 विकेट- 13,430 धावा


जॅक कॅलिस - 273 विकेट - 11,579 धावा


शाहिद आफ्रीदी - 395 विकेट - 8064 धावा


शाकिब अल हसन- 250 विकेट- 5792 धावा


बांगलादेशने विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी सनसनाटी विजय साजरा केला. तर दक्षिण आफ्रिकेला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेसमोर 331 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला आठ बाद 309 धावांचीच मजल मारता आली.