जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2019 09:41 AM (IST)
जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरुच आहेत. रविवारी शोपियान भागात झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
Getty Images)
जम्मू : जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरुच आहेत. रविवारी शोपियान भागात झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या दहशतवाद्यांनी सुरक्षाबलातील जवानांच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यानंतर जवानांनी या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. शोपियानच्या चित्रगाम परिसरातून जाणाऱ्या सुरक्षाबलातील जवानांच्या गाडीवर दहशतवाद्यांना हल्ला केला. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरु झाला. यादरम्यान जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. चकमकीनंतर चित्रगाम आणि शोपियान परिसरात जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. 2019 या वर्षात (गेल्या पाच महिन्यांमध्ये) जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी सुरु आहेत. सैन्याकडून काश्मीर प्रातांत सर्च ऑपरेशन्स सुरु आहेत. यादरम्यान जवानांनी 103 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले आहे. परंतु या चकमकींमध्ये आपले 62 जवान शहीद झाले आहेत. 2018 या संपूर्ण वर्षात जवानांनी 257 दहशतवाद्यांना कंटस्नान घातले होते. यादरम्यान 91 जवान शहीद झाले होते.