T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला भारताकडून (India Beats Pakistan) पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानच्या पराभवाला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) कारणीभूत ठरला. या सामन्यात पाकिस्ताननं दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांची तारांबळ उडाली. पंरतु, एकट्या विराटनं हार्दिक पांड्यालासोबत (Hardik Pandya) घेऊन भारताला विजय मिळून दिला. या सामन्यात विराटनं 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. भारताच्या विजायात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विराटचं संपूर्ण देश कौतूक करत आहे. त्यानंतर विराटनं चाहत्यांसाठी एक खास पोस्ट लिहिलीय.


पाकिस्तानच्या संघाला पराभवाची धुळ चारल्यानंतर विराट कोहलीनं ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट केली. या ट्विटच्या माध्यमातून विराट कोहलीनं सर्व चाहत्यांचे आभार मानले. "एवढ्या मोठ्या संख्येनं आल्याबद्दल आमच्या सर्व चाहत्यांचे आभार", असं तो म्हणाला. या पोस्टसोबत कोहलीनं या सामन्याचे काही खास फोटोही पोस्ट केले आहेत. कोहलीचे हे ट्विट प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे.


विराट कोहलीचं ट्वीट-






 


विराट ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार
160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. भारतीय संघानं अवघ्या 31 धावांत चार विकेट गमावल्या. त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी समंजस खेळी करत संघाचा डाव सावरला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 82 चेंडूत 113 धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेली.


भारतानं चार विकेट्स राखून सामना जिंकला
भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात अनेक चढ उतार पाहायला मिळाले. कधी सामना पाकिस्तानच्या बाजूनं झुकताना दिसला. तर, कधी सामन्यात भारताचं पारडं जड दिसत होतं. पण अखेरच्या तीन षटकात विराट कोहली आणि हार्दिक पाड्यानं आक्रमक खेळी करत भारताला विजय मिळून दिला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता होती. पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. मात्र, एकट्या विराट कोहलीनं भारताची बुडती नाव वाचवली. यासह भारतानं टी-20 विश्वचषकातील सुरुवात विजयानं केली.


हे देखील वाचा-