T20 World Cup 2022: आयसीसी टी-20 विश्वचषक 2022च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना खेळला जातोय. सिडनी क्रिकेड ग्राऊंडवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं निर्धारित 20 षटकात दोन विकेट्स गमावून नेदरलँड्ससमोर 180 धावांचं लक्ष्य ठेवलं. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीनं नेदरलँड्सविरुद्धही आक्रमक फलंदाजी केली. या सामन्यात नाबाद अर्धशतकीय खेळी केली. या कामगिरीसह विराटनं वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडीत काढलाय. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर पोहचलाय.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82 धावांची खेळी केल्यानंतर नेदरलँड्सविरुद्धही त्यानं 44 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात एकमेव श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेनं एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. जयवर्धनेनं टी-20 विश्वचषकाच्या 31 डावात 1 हजार 16 धावा केल्या आहेत. तर, विराट कोहलीच्या नावावर सध्या 989 धावांची नोंद आहे. या यादीत ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानं टी- 20 विश्वचषकातील 31 डावात 965 धावा केल्या आहेत. नेदरलँड्सविरुद्ध सामन्यापूर्वी विराट 927 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर होता. ख्रिस गेलला मागं टाकण्यासाठी विराट कोहलीला अवघ्या 38 धावांची आवश्यकता होती. दरम्यान, नेदरलँड्सविरुद्ध सामन्यात त्यानं 62 धावांची खेळी करत ख्रिस गेलचा विक्रम मोडलाय. तर, महेला जयवर्धनेचा विश्वविक्रम मोडण्यासाठी विराट फक्त 27 धावा दूर आहे.
ट्वीट-
टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय-
| क्रमांक | नाव | धावा |
| 1 | विराट कोहली | 989 |
| 2 | रोहित शर्मा | 904 |
| 3 | युवराज सिंह | 593 |
| 4 | महेंद्रसिंह धोनी | 529 |
हे देखील वाचा-