T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आज ग्रुप 1 मधील न्यूझीलंड आणि आयर्लंड (NZ vs IRE) या दोन संघात सामना पार पडला. सामन्यात न्यूझीलंड संघाने 35 धावांनी विजय मिळवत थेट सेमीफायनल गाठली आहे. दरम्यान आता ग्रुप 1 मधून आणखी एक संघ सेमीफायनलमध्ये जाणार असून यासाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड हे दोन संघ शर्यतीत आहेत. उद्या अर्थात शनिवारी (5 नोव्हेंबर) होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध इंग्लंड सामन्यानंतर नेमका कोणता संघ पुढे जाईल, हे स्पष्ट होईल. कारण ऑस्ट्रेलिया सध्या सामना जिंकून 7 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पण इंग्लंडने श्रीलंका संघाला मात दिल्यास त्यांचेही 7 गुण होतील आणि नेटरनरेटही त्यांचा चांगला असल्याने ते ऑस्ट्रेलियाला मात देऊन पुढे जाऊ शकतात. दुसरीकडे श्रीलंका संघ जिंकला तरी त्यांचे 6 गुणच होणार असल्याने त्यांचं आव्हान संपलंच आहे. तर अफगाणिस्तान, आयर्लंड यांचं आव्हान आधीच संपलं आहे. 

कशी आहे ग्रुप 1 ची गुणतालिका?

सुपर-12 ग्रुप 1

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
1 न्यूझीलंड 5 3 1 1 7 +2.113
2 ऑस्ट्रेलिया 5 3 1 1 7 -0.173
3 इंग्लंड 4 2 1 1 5 +0.547
4 श्रीलंका 4 2 2 0 4 -0.457
5 आयर्लंड 5 1 3 1 2 -1.165
6 अफगाणिस्तान 5 0 2 2 2 -0.718

कसे पार पडले आजचे सामने?

आज दिवसभरातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं आयर्लंडचा (New Zealand vs Ireland) 35 धावांनी पराभव करत सेमीफायनलचं तिकीट मिळवलं. या स्पर्धेत सेमीफायनलचं स्थान गाठणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडच्या संघानं न्यूझीलंडच्या संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित 20 षटकात आयर्लंडसमोर 186 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ 150 धावापर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात झंझावाती अर्धशतकीय खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) सामनीवीर म्हणून गौरवण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी विजय मिळवत सेमीफायनलच्या शर्यतीतील आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं सामना गमावला असला तरी त्यांनी दिलेली अखेरच्या चेंडूपर्यंतची झुंज वाखाणण्याजोगी होती. खासकरुन राशीद खाननं 23 चेंडूत नाबाद 48 रन केले पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आधी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने दिलेलं 169 धावाचं आव्हान पार करतान अफगाणिस्तानचा संघ 20 ओव्हरमध्ये 164 धावाच करु शकला.

हे देखील वाचा-