T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान आमने-सामने आले आहेत. अॅडिलेड क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात असलेल्या हा सामना ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघानं निर्धारित 20 षटकात अफगाणिस्तानसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडून (David Warner) मोठ्या खेळीची अपेक्षा केली होती. परंतु, स्विच हिट शॉट खेळण्याच्या प्रयत्नात डेव्हिड वॉर्नर (David Warner) क्लीन बोल्ड झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या करो या मरोच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं ऑस्ट्रेलियाच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानं 18 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीनं 25 धावांची खेळी केली. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या डावातील सहाव्या षटकात स्विच हिट शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो आऊट झाला. दरम्यान, डेव्हिड वॉर्नर स्विच हिट खेळण्याच्या मूडमध्ये असल्याचं अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीननं चेंडू टाकण्यापूर्वीच ओळखलं. त्यानं स्लोअर चेंडू टाकत डेव्हिड वॉर्नरला चकवा दिला. डेविड वॉर्नरला आऊट होणं, ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी मोठा धक्का होता. या सामन्यात डेविड वॉर्नर मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा केली होती. परंतु,नवीननं ऑस्ट्रेलिया चाहत्यांच्या अपेक्षा भंग केल्या.



 


दुखापतीमुळं फिंच, स्टार्क आणि टीम डेविड बाहेर
टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील आपल्या अखेरच्या आणि महत्वपूर्ण सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का लागला. दुखापतीमुळं कर्णधार आरोन फिंच, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि ऑलराऊंडर टीम डेविड अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यातून बाहेर पडले. त्यांच्या जागेवर केन रिचर्डसन, कॅमरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथला संधी देण्यात आली. तर, या सामन्यात मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतत्व करत आहे. महत्वाचं म्हणजे, सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी अफगाणिस्तानच्या संघाला मोठ्या अंतरानं पराभूत करावी लागेल.


हे देखील वाचा-