AUS vs IND, ICC Mens T20 World Cup Warm-up Matches: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) असा सराव सामना ब्रिस्बेनच्या गाबा येथे नुकताच पार पडला. या सामन्यात एक रोमहर्षक क्रिकेट मॅच काय असते याचा साऱ्यांनाच प्रत्यय आला. कारण सामन्याच्या अखेरच्या षटकात भारतानं विजय ऑस्ट्रेलियाकडून खेचून आणला. विशेष म्हणजे सामन्यात नसणारा मोहम्मद शमी (Mohammed Shami) अखेरच्या षटकात ओव्हर टाकण्यासाठी आला आणि विजयाचा शिल्पकार ठरला. शमीने अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर प्रत्येकी दोन धावा दिल्यानंतर अखेरच्या चारही चेंडूत विकेट्स मिळवल्या. यातील एक विकेट रनआऊट असल्यानं शमीची हॅट्रीक हुकली पण त्यानं केलेल्या कमाल कामगिरीची चर्चा सर्वत्र सुरु आहे. शमीनं घेतलेल्या विकेट्समध्ये कोहलीनं कमिन्सची पकडलेली एकहाती कॅचही पाहण्याजोगी होती.
सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीला भारताला यावं लागलं. ज्यानंतर सलामीवीर केएल आणि रोहितनं चांगली सुरुवात करुन दिली. पण 15 धावा करुन कर्णधार रोहित बाद झाला. ज्यानंतर कोहली मैदानात आला तो देखील 19 धावा करुन तंबूत परतला पण केएल मात्र टिकून खेळत होता. त्याला सूर्यकुमारनही चांगली साथ दिली. राहुल आणि सूर्या दोघांनी अर्धशतकं झळकावत अनुक्रमे 57 आणि 50 धावा केल्या. दिनेशनं आजही 20 धावांची फिनिशिंग दिल्याने भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचली.
187 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि आरॉन फिंच यांनी कमाल सुरुवात केली. 35 धावा करुन मार्श बाद झाला पण कॅप्टन फिंच क्रिजवर कायम होता. स्मिथ आणि मॅक्सवेलनं प्रत्येकी 11 आणि 23 धावा केल्या, पण त्या दोघानंतर इतर फलंदाजांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. फिंचनं अर्धशतक झळकावून संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. पण 19 व्या ओव्हरमध्ये हर्षलनं त्याला 76 धावांवर बाद केलं आणि भारताच्या विजयाच्या आशा जिवंत झाल्या. त्यानंतर शेवटची ओव्हर टाकण्यासाठी शर्मानं प्लेईंग 11 मध्ये नसणाऱ्या मोहम्मद शमीला मैदानात बोलवलं आणि शमीने कमाल करत सामना भारताला जिंकवून दिला. शमीने पहिल्या दोन चेंडूवर प्रत्येकी दोन धावा दिल्यानंतर अखेरच्या चारही चेंडूत विकेट्स मिळवल्या. यातील एक विकेट रनआऊट असल्यानं शमीची हॅट्रीक हुकली पण त्यानं सामना भारताला 6 धावांनी जिंकवून दिला.
हे देखील वाचा-
- IPL 2023: रवींद्र जाडेजा चेन्नईच्या संघाची साथ सोडणार? आयपीएल 2023च्या ऑक्शनपूर्वी महत्वाची माहिती