IPL 2023: टी-20 विश्वचषकानंतर आयपीएलच्या सोळावा हंगाम खेळला जाणार आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शन होईल. यादरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा गोठ्यातून महत्त्वाची माहिती समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) सोडायचं नाही. कोणताही खेळाडू रवींद्र जाडेजाची जागा घेऊ शकत नाही, असंही धोनीनं संघ व्यवस्थापनाशी (Chennai Super Kings) बोलताना स्पष्ट केलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाशी सल्लामसलत करत रवींद्र जाडेजासारख्या खेळाडूला रिलीज केलं जाऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं. धोनीच्या मते, रवींद्र जाडेजाची क्षमता पाहता त्याच्या जागा इतर कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही.
आयपीएल 2022 नंतर जाडेजानं चेन्नई संघाशी संबंधित सर्व पोस्ट हटवल्या
आयपीएलच्या पंधराव्या हंगामानंतर रवींद्र जाडेजा आणि चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापन यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत.आयपीएल 2022 नंतर जाडेजानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सीएसकेशी संबंधित सर्व पोस्ट हटवल्या होत्या. तेव्हापासून आयपीएलच्या पुढच्या हंगामात रवींद्र जाडेजा चेन्नईच्या संघाचा भाग नसेल, अशा चर्चांना उधाण आलं.
कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मतभेदाला सुरुवात
आयपीएलचा पंधरावा हंगमात रवींद्र जाडेजाकडं संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. परंतु, रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ काही खास कामगिरी करू शकला नाही. जाडेजानं सुरुवातीच्या आठ सामन्यात चेन्नईच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. यापैकी फक्त दोन सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आला. तर, सहा सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. याचदरम्यान जाडेजानं अचानक सीएसकेच्या संघाचं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर पुन्हा महेंद्रसिंह धोनीवर चेन्नईच्या संघाचं कर्णधारपद सोपवलं गेलं. जाडेजानं स्वतः कर्णधारपद सोडलं नसून संघ व्यवस्थापनानं त्याच्यावर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव टाकला होता, अशी चर्चा होती.
चेन्नईच्या संघासाठी जाडेजाचं मोलाचं योगदान
आयपीलएलच्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईच्या संघानं रवींद्र जाडेजाला 16 कोटी रुपयांत रिटेन केलं होतं. तर, धोनीला 12 कोटींमध्ये रिटेन केलं होतं. 2012 पासून जाडेजा चेन्नईच्या संघाचा भाग आहे. चेन्नईच्या संघानं आतापर्यंत चार आयपीएलच्या ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यापैकी रवींद्र जाडेजा दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या संघाचा भाग होता.
हे देखील वाचा-