Virat Kohli Birthday : विराट नाव जरी घेतलं तरी कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांची छाती अभिमानाने मोठी होते..आणि याचं कारण आहे विराट कोहलीचा खेळ, त्याचं क्रिकेटप्रती असणारं प्रेम, त्याचं अॅग्रेशन... विराटनं आजवर एक, दोन नाही तर अनेक रेकॉर्ड नावावर केले आहेत. विशेष गोष्ट म्हणजे त्यानं हे सारे रेकॉर्ड्स दिमाखात नावे केले आहेत. पण 2019 च्या अखेरीस विराटनं बांगलादेशविरुद्ध एक शतक ठोकलं आणि त्यानंतर विराटचा कमाल, दमदार असा फॉर्म हळूहळू कमी झाला... बघता बघता दोन वर्षे उलटली...तब्बल 70 शतकं ठोकणारा विराट एका शतकासाठी तरसू लागला... कर्णधारपदावरुनही तो खाली उतरला... खेळावर फोकस केलं पण तरी फॉर्म गवसत नव्हता...अगदी टीम इंडियातून विराटला बाहेर बसवा अशी मागणीही काही दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी केली...
पण विराटनं हार मानली नाही, आशिया चषक 2022 मध्ये अफगाणिस्ताविरुद्ध विराटनं शतक ठोकलं आणि मग काय चाहत्यांचा लाडका किंग कोहली पुन्हा फॉर्मात परतला...सध्या सुरु टी20 वर्ल्ड कपमध्येही विराट अगदी एकहाती टीम इंडियाचा गाडा हाकताना दिसत आहे. आतापर्यंत भारतानं खेळलेल्या 4 सामन्यांतील तीन सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावलं असून दोन सामन्यात सामनावीर म्हणून त्याला गौरवण्यातही आलं आहे. तो स्वस्तात बाद झालेलाच सामना भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गमावला असून यावरुन विराटचं वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची नौका हाकत असल्याचं दिसून येत आहे.
वर्ल्ड कपचा विचार केला तर सर्वात पहिल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात अगदी चुरशीची लढत पाहायला मिळाली. भारताला विजयासाठी 160 धावा करायच्या होत्या, पण 31 धावांवर 4 विकेट गमावल्यानंतर कोहली आणि हार्दिक पंड्याने शानदार भागिदारी करत भारताचा विजय पक्का केला. विराटने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या होत्या. त्यानंतर नेदरलँडविरुद्धही विराटनं नाबाद 62 धावा केल्या. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो स्वस्तात बाद झाला आणि भारतानं सामना गमावला होता. ज्यानंतर नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही विराटनं फलंदाजीची धुरा सांभाळत नाबाद 64 धावांची खेळी केली. यावरुन दिसून येतं की 4 पैकी 3 सामन्यात तर विराट नाबाद राहिला. त्यामुळे विराटनं केलेल्या या कमाल कामगिरीच्या जोरावर त्यानं टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं हे नक्की! आता आगामी सामन्यातही विराट भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा सांभाळेल आणि रेकॉर्डमागे रेकॉर्डही ब्रेक करेल हे नक्की!