Happy Birthday Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आज त्याच्या 34वा वाढदिवस साजरा करत आहे. दिल्ली येथे जन्मलेल्या कोहलीला रन मशीन, किंग कोहली इत्यादी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या विराटनं त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातलीय. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात विराट कोहलीनं धुमाकूळ घातलाय.या स्पर्धेतील भारतानं आतापर्यंत जिंकलेल्या तिन्ही सामन्यात विराटनं महत्वाची भूमिका बजावली आहे. विराटनं पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात नाबाद 82 धावांची महत्वपूर्ण खेळी करत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्यानंतर नेदरलँड्स आणि बांगलादेशविरुद्ध सामन्यातही त्यानं अर्धशतकीय खेळी केलीय. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीतही विराट कोहली अव्वल स्थानी पोहचलाय.


विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचं वडील प्रेम कोहली हे फौजदारी वकील होते. विराट कोहलीला एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहिण आहे. विराटच्या भावाचं नाव विकास तर, बहिणीचं नाव भावना असं आहे. विराट कोहली दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये लहानाचा मोठा झाला, त्याने विशाल भारती पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं. विराट कोहलीनं पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. विराट इयत्ता नववीत असताना क्रिकेटचा सराव करण्यासाठी पश्चिम विहारला गेला. मात्र, त्याचं कुटुंब 2015 पर्यंत मीरा बाग येथे राहत होतं. त्यानंतर ते गुरुग्रामला स्थलांतरित झाले.


अवघ्या 23 इनिंगमध्ये 1000 धावांचा टप्पा
टी-20 विश्वचषकातील सुपर 12 फेरीतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं इतिहास रचलाय. विराट कोहली त्याच्या टी-20 कारकिर्दीतील पाचवा टी-20 विश्वचषक खेळत आहेत. टी-20 विश्वचषकातील अवघ्या 23 इनिंगमध्ये त्यानं 1000 धावांचा टप्पा गाठला. याशिवाय, त्यानं महेला जयवर्धनेचा सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडलाय. टी-20 विश्वचषकातील इतिहासात महेला जयवर्धनेनं 31 डावात 1 हजार 16 धावा केल्या होत्या. या दरम्यान, विराटच्या बॅटमधून 12 अर्धशतकं झळकली आहेत. विराटनं 2012 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक खेळला. ज्यात त्यानं 185 धावा केल्या. त्यानंतर 2014 आणि 2016 च्या टी-20 विश्वचषकात विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. टी-20 विश्वचषकात सर्वाधिक दोन वेळा सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा खिताब जिंकणारा विराट एकमेव खेळाडू आहे. 


विराटची टी-20 विश्वचषकातील जबरदस्त कामगिरी
विराट कोहलीनं यंदाच्या टी-20 विश्वचषकाची सुरुवात 845 धावांपासून केली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 धावांची खेळी करण्यापूर्वी त्यानं पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी केली. या कामगिरीसह त्यानं तिलकरत्ने दिलशान (897 धावा), रोहित शर्मा (921 धावा) आणि ख्रिस गेल (965 धावा) यांना मागं टाकून टी-20 विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्यानं जयवर्धनेचा विक्रम मोडला.


विराट कोहलीची कारकिर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कोहलीनं टी-20 सामन्यांमध्ये 3 हजार 932 धावा केल्या आहेत, तो लवकरच या फॉरमॅटमध्ये 4000 धावा पूर्ण करणार आहे. 2019 पासून फॉर्मच्या शोधात असलेल्या विराट कोहलीनं प्रथम आशिया चषक आणि त्यानंतर टी-20 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्‍यानं आशिया चषक स्पर्धेत त्यानं टी-20 फॉरमेटमधील पहिलं शतक झळकावलं होतं. 


हे देखील वाचा-