Pakistan vs England, T20 WC Final : टी20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) फायनलचा सामना इंग्लंडने 5 विकेट्सनी जिंकत इतिहास रचला आहे. दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर इंग्लंडनं नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेलेला हा पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) टी20 विश्वचषक स्पर्धेतील फायनलचा सामना एक लो स्कोरिंग मॅच असूनही चुरशीची असल्याचं पाहायला मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवत अवघ्या 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे 138 धावाचं आव्हान गाठताना इंग्लंडला अवघड झालं. पण त्याचवेळी त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने एकहाती झुंज देत नाबाद 52 धावा करत 5 गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला. या विजयासह 2010 नंतर पुन्हा एकदा इंग्लंडनं टी20 विश्वचषक जिंकला आहे.






सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय बोलर्सनी अगदी योग्य असल्याचं दाखवत अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आणि रिझवान यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण 15 धावा करुन रिझवान बाद झाला. मग मोहम्मद हॅरीसही 8 धावांवर बाद झाला. कर्णधार बाबर चांगली फलंदाजी करत होता, पण 32 धावा करुन तोही तंबूत परतला. इतरही फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण शान मसूदने फटकेबाजी करत 28 चेंडूत 38 धावा ठोकत पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. इतर फलंदाज खास कामगिरी करु न शकल्याने 137 धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. इंग्लंडकडून सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पण अष्टपैलू सॅम करनने 4 ओव्हरमध्ये केवळ 12 धावा देत 3 महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. ख्रिस जॉर्डन आणि आदिल राशीद यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. बेन स्टोक्सनं एक महत्त्वाची विकेट घेतली.


स्टोक्सनं काढली मॅच


138 धावांचं माफक लक्ष्य गाठतानाही इंग्लंडला फार अडचणी आल्या. त्यांची सुरुवातही खास झाली नाही. अॅलेक्से 1 धाव करुन बाद झाला. मग फिलीपही 10 रनांवर तर कर्णधार बटलर 26 रनांवर तंबूत परतला.  मग स्कोक्स आणि ब्रुकने डाव सावरला पण ब्रुक 20 रनांवर बाद झाला. स्टोक्सची झुंज कायम होती. त्याला मोईन अलीने साथ दिली, पण 19 रनांवर तोही बाद झाला. ज्यानंतर मात्र स्टोक्सने विजय पक्का करत नाबाद 52 धावांच्या मदतीने संघाला सामना जिंकवून दिला. अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या सॅम करनला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून यावेळी गौरवण्यात आलं.


हे देखील वाचा-