World Cup 2023 : भारतात सुरु असलेला विश्वचषक उत्तरार्धाकडे झुकला आहे. गतविजेता इंग्लंड, पाकिस्तान यांची विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. शुक्रवारी रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला अन् सेमीफायनलचे स्वप्न धुळीस मिळाले. पाकिस्तान संघाला सहा सामन्यापैकी चार पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान संघाचे सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता अतिशय धुसूर आहे. त्याशिवाय गतविजेता इंग्लंड संघचेही सेमीफायनलमध्ये पोहचणं कठीण दिसत आहे. 


सेमीफायनलचे चित्र स्पष्ट - 


दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने पाच सामन्यात विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकाही लयीत आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाही आता पुन्हा फॉर्मात आलाय. न्यूझीलंडची स्पर्धेतील कामगिरी दमदार आहे. 


सहा संघाची अवस्था बिकट - 


पाकिस्तानशिवाय इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्थान आणि नेदरलँड या संघाचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे.  नेदरलँड, इंग्लंड, बांगलादेश या तीन संघाला पाच सामन्यात फक्त एक विजय मिळवता आलाय. तर अफगाणिस्तान संघाने पाच सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. पाकिस्तान संघाला सहा सामन्यात चार पराभवाचा सामना करावा लागलाय. अफगाणिस्तान संघाने उर्वरित चारही सामन्यात विजय मिळवला तर सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. 


किती गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहचणार? 


2019 मध्ये इंग्लंड संघाने 12 गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचे प्रत्येकी 11 गुण होते. पण न्यूझीलंडचा रनरेट सरस होता, त्यामुळे ते चौथ्या क्रमांकावर होते. न्यूझीलंडने 11 गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला होता.  पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी प्रत्येकी  पाच सामन्यात विजय मिळवला होता. तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.  भारताने 15 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. तर ऑस्ट्रेलिया 14 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. 


सध्याच्या स्थिती पाहाता 14 गुण झालेला संघ सहज सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. म्हणजे, सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी सात सामन्यात विजय मिळवावा लागेल.  12 गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. पण इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. 


पाकिस्तानची स्थिती काय ?


पाकिस्तान संघाने आतापर्यंत सहा सामन्यात फक्त दोन विजय मिळवले आहेत. चार गुणांसह पाकिस्तान संघ सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान संघ अजूनही सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. पण त्यांना उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. उर्वरिती तीन सामन्यात पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. टॉप 4 मध्ये असणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचा कमीतकमी दोन सामन्यात पराभव व्हावा लागेल. 


बांगलादेशचे समीकरण काय - 


बांगलादेशची स्थिती अतिशय खराब आहे. बांगलादेशला पाच सामन्यात चार पराभवाचा सामना करावा लागलाय. बांगलादेशचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेय.  आणखी एक पराभव झाल्यास बांगलादेशला गाशा गुंडाळावा लागेल. काही करिष्मा झाला तरच बांगलादेश सेमीफायनलमध्ये जाऊ शकतो. बांगलादेश संघाला उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्यावेळी त्यांचे 10 गुण होतील. तर चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला तीन सामन्यात पराभव झाल्यासच बांगलादेश सेमीफायनलमध्ये जाईल. 


नेदरलँड - 


नेदरलँड आणि बांगलादेशची स्थिती सारखीच आहे. दोन्ही संघाला प्रत्येक सामन्यात विजय मिळवावा लागेल. 


 इंग्लंडची अवस्थाही कठीण - 


इंग्लंड संघाचीही स्थिती काही वेगळी नाही, स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. इंग्लंडचा एका सामन्यात पराभव झाल्यास विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येईल. इंग्लंडला उर्वरित चार सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवर नजर ठेवावी लागेल. 


अफगानिस्तान आणि श्रीलंका यांची स्थिती काय ?


अफगानिस्तान आणि श्रीलंका  दोन्ही संघाने पाच सामन्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला.  दोन्ही संघाला उर्वरित सामन्यात विजय मिळवावा लागेल. पाकिस्तान, बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यापैक्षा या अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघाचे सेमीफायनलमध्ये पोहचण्याचे चान्सेस जास्त आहे.