T20 WC 2022 : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप भारताच्या प्लेईंग 11 ची निवड केली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषक होणार आहे. हा आठवा टी 20 विश्वचषक असेल. या विश्वचषकासाठी सर्वच संघांनी कंबर कसली असून चाचपणी सुरु झाली आहे. भारतीय संघही तयारीला लागला आहे. इग्लंड दौऱ्यापासून भारतीय संघाची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 मालिकेची तयारी सुरु होणार आहे. त्यापूर्वीच इरफान पठाण याने त्याची वर्ल्डकपसाठी प्लेईंग 11 निवडली आहे.
इरफाण पठाण याने प्लेईंग 11 मधून ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि मोहम्मद शामी यासारख्या खेळाडूंना वगळले आहे. विशेष म्हणजे, इरफान पठाण याने दिनेश कार्तिकची विकेटकिपर म्हणून निवड केली आहे. 37 वर्षीय दिनेश कार्तिक याने आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी केली होती. त्याकामगिरीच्या जोरावर कार्तिकने टीम इंडियात पुनरागमन केले. नुकत्याच मायदेशात झालेल्या टी 20 मालिकेतही कार्तिक याने फिनिशरची भुमिका अचूक पार पाडली. तर दुसरीकडे कर्णधारपद सांभाळणाऱ्या ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.
इरफाण पाठणने सलामीसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची निवड केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार विराट कोहलीला स्थान दिलेय. भारताच्या टी 20 इतिहासातील हे सर्वात यशस्वी फलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय संघाची फलंदाजी मजबूत होईल, असे पठाण याने सांगितले. इरफाण पठाण याने चौथ्या क्रमांकावर सुर्यकुमार यादवला स्थान दिलेय. तर पाचव्या क्रमांकावर अष्टपैलू हार्दिक पांड्याला स्थान दिले. सहाव्या क्रमांकावर दिनेश कार्तिक आणि सातव्या क्रमांकावर रवींद्र जाडेजाला स्थान दिलेय. हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर फिनिशरची भूमिका सोपवली आहे. तर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर अष्टपैलू खेळाडूची जबाबदारी सोपवली आहे. रवींद्र जाडेजाशिवाय युजवेंद्र चहलला फिरकीपटू म्हणून स्थान दिलेय. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहसोबत भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांना स्थान दिलेय.
इरफान पठाण याने निवडलेली प्लेईंग 11 -
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह