Hardik Pandya Statement After T20 World Cup 2024 Final : 17 वर्षानंतर भारताने टी20 विश्वचषकावर (T20 World Cup 2024) नावं कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) सामन्यात हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अखेरच्या चार षटकात भारतीय (Team India) गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेकडून सामना हिसकावून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यातील शेवटचं षटकं टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याने टाकलं. विश्वचषकाआधीचा काळ पंड्यासाठी फार संघर्षमय होता. विश्वचषकाआधी हार्दिक पांड्याला अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल केलं जात होतं. पण, या ट्रोलर्सला त्यानं चांगली चपराक दिली आहे.


तो आला, तो लढला, तो जिंकला


विश्वचषकाआधी हार्दिक पांड्याच्या आयुष्यात अनेक संकटं आली. आयपीएल 2024 मध्ये चाहते हार्दिक पांड्याला ट्रोल करत त्याच्यासमोर त्याला अपशब्द सुनावत त्याचा सातत्याने अपमान करत होते. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक घडमोडी घडत होत्या. यातच त्याच्या पत्नीसोबत घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या. आयपीएलनंतर हार्दिकची विश्वचषकासाठी निवड केल्यावर त्यावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. पण, या सर्व ट्रोलर्सना हार्दिकनं सणसणीत उत्तर दिलं आहे. 


विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं


त्यावेळी असं वाटलं की, ''माझे गेलेले सहा महिने परत आले. बरंच काही घडलं. काय नाही झालं, मी स्वत:ला खूप कंट्रोल केलं. जेव्हा मला रडायला येत होतं, तेव्हा मी रडलो नाही, कारण मला लोकांना दाखवायचं नव्हतं. माझ्या संकटात जे आनंदी होते, त्यांना मला आणखी आनंद द्यायचा नव्हता आणि मी कधी देणारही नाही. आज आज सहा महिने गेल्यानंतर पण, देवाची कृपा, मला इतकी चांगली संधी पण कशी मिळाली पाहा. शेवटचं षटक जिथे अशी परिस्थिती होती, तिथे मला संधी मिळाली आणि मी करुन दाखवलं. आता यावर आणखी काय बोलू.''






नेमकं काय म्हणाला हार्दिक पांड्या?


हार्दिक पांड्या ट्रोलर्सला उत्तर देताना म्हणाला, "मी प्रतिष्ठेवर विश्वास ठेवतो, जे लोक मला एक टक्काही ओळखत नाहीत, ते इतकं काही बोलले. लोक खूप काही म्हणाले, पण काही फरक पडत नाही. मी नेहमी मानतो की शब्दांनी उत्तर देऊ नये, परिस्थिती उत्तर देते. वाईट काळ कायम टिकत नाही. तुम्ही जिंकलात किंवा हरलात तरी प्रतिष्ठा राखणं महत्त्वाचं आहे. चाहत्यांना आणि प्रत्येकाने हे शिकले पाहिजे. आपण चांगलं आचरण राखलं पाहिजे. मला खात्री आहे की, आज ते लोक आनंदी असतील."


दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या षटकात 16 धावांची गरज होती. हार्दिक पांड्याच्या खांद्यावर शेवटच्या षटकाची जबाबदारी होती. पांड्याने दक्षिण आफ्रिकेला 16 धावा करू दिल्या नाहीत. या षटकाबद्दल तो म्हणाला की, "खरं सांगायचं तर, मी मजा करत होतो. खूप कमी लोकांना जीवनात असा बदल घडवणाऱ्या संधी मिळतात. याचा विपरीत परिणाम होऊ शकला असता, पण मी अर्धा भरलेला ग्लास पाहत होतो, अर्धा रिकामा नाही. मी दडपण घेतलं नव्हतं, कारण मला माझ्या कौशल्यावर विश्वास होता."


पुढचा T20 विश्वचषक भारतात होणार आहे आणि यावेळी हार्दिक पांड्यावर कर्णधारपदाची जबाबदारी असेल, याबाबत पांड्या म्हणाला की, "2026 साठी अजू खूप वेळ आहे. रोहित आणि विराटसाठी मी खूप आनंदी आहे. भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज जे या विजयाचे पात्र होते, त्यांच्यासोबत या फॉरमॅटमध्ये खेळताना मजा आली. त्यांची उणीव नक्कीच जाणवेल, पण त्यांना यापेक्षा चांगला निरोप देऊ शकलो नसतो."