Happy Birthday Virat Kohli: भारतीय फलंदाज विराट कोहली आज 34 वर्षाचा झालाय. विराटच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. विराट कोहली फक्त भारतात नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचे चाहते जगभरात विखुरले आहेत. दरम्यान, विराटच्या कारकिर्दीतील पाच जबरदस्त इनिंगवर एक नजर टाकुयात, जे आजही त्याचे चाहते विसरले नाहीत.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात विराट कोहलीनं धुमाकूळ घातलाय.या स्पर्धेतील भारतानं आतापर्यंत जिंकलेल्या तिन्ही सामन्यात विराटनं महत्वाची भूमिका बजावली आहे. विराटनं पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात नाबाद 82 धावांची महत्वपूर्ण खेळी करत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्यानंतर नेदरलँड्स आणि बांगलादेशविरुद्ध सामन्यातही त्यानं अर्धशतकीय खेळी केलीय. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीतही विराट कोहली अव्वल स्थानी पोहचलाय.
- इंग्लंडविरुद्ध 149 धावा (2019, कसोटी)
भारत आणि इंग्लंड यांच्यात 2019 मध्ये खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहली जबरदस्त खेळी केली. इंग्लडमध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात एकिकडं भारतीय फलंदाज एकामागून एक आऊट होत असताना विराटनं संघाचा डाव सावरला. या सामन्यात विराट कोहलीनं 149 धावांची खेळी केली.
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 153 धावा (2018, कसोटी)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कठीण खेळपट्टीवर भारताच्या इतर कोणत्याही फलंदाजाला 50 धावांचा आकडा गाठू शकला नाही, तिथे विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध धाडसी शतक झळकावले.
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 82 धावा (2016, टी-20)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2016 मध्ये मोहाली येथे खेळण्यात आलेल्या टी-20 सामन्यात विराट कोहलीनं फिनिशरची भूमिका बजावली होती. या सामन्यात विराट कोहलीनं 51 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. विराटची ही खेळी आजही त्याचे चाहते विसरू शकले नाहीत.
- ऑस्ट्रलियाविरुद्ध 115 आणि 141 धावा (2014, कसोटी)
भारताचा कसोटी कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने अॅडिलेड ओव्हलवर दुहेरी शतकं झळकावून सर्वांनाच लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र, या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
- पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची खेळी (2012, एकदिवसीय क्रिकेट)
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीनं संघासाठी 183 धावांचं योगदान दिलं होतं. महत्वाचं म्हणजे, विराट कोहलीनं धावांचा पाठलाग करताना ही तुफानी खेळी केली होती.
विराट कोहलीची कारकिर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कोहलीनं टी-20 सामन्यांमध्ये 3 हजार 932 धावा केल्या आहेत, तो लवकरच या फॉरमॅटमध्ये 4000 धावा पूर्ण करणार आहे. 2019 पासून फॉर्मच्या शोधात असलेल्या विराट कोहलीनं प्रथम आशिया चषक आणि त्यानंतर टी-20 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यानं आशिया चषक स्पर्धेत त्यानं टी-20 फॉरमेटमधील पहिलं शतक झळकावलं होतं.
हे देखील वाचा-