WI T20 WC Sqaud : पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी (T20 WC 2022) वेस्ट विंडिज संघाची घोषणा झाली आहे. विस्फोटक अष्टपैलू आंद्रे रसेल आणि सुनिल नारायण यांना वगळून वेस्ट विंडिजचं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये आंद्रे रसेलचा बोलबाला असतानाही त्याला वगळण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
एविन लुईस याला संघात स्थान देत वेस्ट विडिंजने सर्वांनाच धक्का दिला आहे. युएईमध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकानंतर एविन लुईस याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे एविन लुईसची निवड सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्चचषकामध्ये वेस्ट विंडिज संघाची धुरा निकोलस पूरन याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकात वेस्ट विडिंज संघाला प्रथम पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. वेस्ट विडिंजचा संघ ग्रुप ब मध्ये आहे. 19 ऑक्टोबर रोजी वेस्ट विडिंज झिम्बाब्वेसोबत दोन हात करणार आहे. त्याशिवाय त्यांच्या ग्रुपमध्ये स्कॉटलँड आणि आयरलँड या संघाचा समावेश आहे. ग्रुप ब मधील अव्वल दोन संघाला सुपर 12 मध्ये स्थान मिळणार आहे. दरम्यान, टी 20 विश्वचषकापूर्वी 5 ऑक्टोबर आणि सात ऑक्टोबर रोजी वेस्ट विंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दोन सामन्याची टी 20 मालिका होणार आहे.
मुख्य निवडकर्ता डेसमंड हँस म्हणाले की, वेस्ट विंडिज संघात आम्ही तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश केला आहे. निवड करताना आम्ही सीपीएलमधील युवा खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा विचार केलाय. निवड करण्यात आलेल्या युवा खेळाडूंची या स्पर्धेत चांगली कामगिरी आहे.
वेस्ट विंडिजचा टी20 संघ -
निकोलस पूरन (कप्तान), रोवमॅन पॉवेल, यानिक कॅरिया, जॉनसन चार्ल्स, शेल्डन कॉटरेल, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मैकॉय, रेमन रीफर, ओडियन स्मिथ
कधी कुठे रंगाणार आगामी टी-20 विश्वचषकातील सामने?
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.