मॅन्चेस्टर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं मॅन्चेस्टरमध्ये 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. त्यानं 417 डावांत हा टप्पा गाठून सर्वात जलद 20 हजार धावा करण्याचा मान मिळवला. विराटनं मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर विंडीजविरुद्ध विश्वचषकाच्या साखळी सामन्यात 37 वी धाव घेत लारा आणि सचिनचा विक्रम मागे टाकला.


विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांनीही 453 डावांत 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा पूर्ण करणारा विराट हा भारताचा केवळ तिसराच फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरच्या खात्यात 34,357 धावा जमा आहेत. तर राहुल द्रविडनं 24,208 धावांचा रतीब घातलाय.

विराटची अकरा वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

सामने - 376
डाव - 417
धावा - 20,035
सरासरी - 56.43
शतकं - 66
अर्धशतकं - 93

विश्वचषकात विराटचं सलग चौथं अर्धशतक

विराट कोहलीनं इंग्लंडमधल्या विश्वचषकात आपला सुपर फॉर्म कायम ठेवला आहे. त्यानं मॅन्चेस्टरमध्ये यंदाच्या विश्वचषकातलं सलग चौथं अर्धशतक साजरं केलं. एकाच विश्वचषकात सलग चार वेळा पन्नास पेक्षा अधिक धावा करणारा तो सचिन आणि नवज्योत सिंग सिद्धूनंतरचा तिसरा भारतीय खेळाडू ठरला.

विराटनं यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 82, पाकिस्तानविरुद्ध 77, अफगाणिस्तानविरुद्ध 67 आणि विंडीजविरुद्ध 72 धावा अशा सलग अर्धशतकी खेळी साकारल्या.

भारताचा माजी कसोटीवीर नवज्योत सिंग सिद्धूनं 1987 च्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा अशी कामगिरी बजावली होती. त्यानंतर सचिन तेंडुलकरनं 1996 आणि 2003 च्या विश्वचषकात सलग चार वेळा पन्नासहून अधिक धावा फटकावल्या होत्या.