लीड्स : विश्वचषकाच्या साखळीत टीम इंडियाचा अखेरचा सामना आज श्रीलंकेशी होत आहे. हा सामना लीड्सच्या हेडिंग्लेवर खेळवण्यात येईल. भारतीय संघानं आठपैकी सहा सामने जिंकून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकीट आधीच कन्फर्म केलं आहे. श्रीलंकेचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळं श्रीलंकेविरुद्धचा हा सामना म्हणजे टीम इंडियासाठी उपांत्य फेरीची पूर्वतयारी ठरणार आहे.
भारताची मधली फळी विश्वचषकात सातत्यानं अपयशी ठरली आहे. मधल्या फळीच्या फलंदाजांना त्यांचा आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी या सामन्यात संधी मिळणार आहे. स्ट्राईक रेट उंचावण्यात अपयशी ठरलेल्या धोनीला सूर मिळणं हे टीम इंडियाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे.
श्रीलंकेचा संघ 1999 नंतर पहिल्यांदाच बाद फेरीआधीच गारद झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा औपचारिक सामना असला तरी विराटसेनेला मात्र उपांत्य फेरीच्या तयारीसाठी ही चांगली संधी आहे.
विश्वचषकातल्या आठपैकी सहा सामन्यांत टीम इंडियानं बाजी मारली आहे. टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज आणि गोलंदाजांचा प्रभावी मारा हे या यशाचं गमक आहे. पण असं असलं तरी भारतीय संघव्यवस्थापनाला उपांत्य फेरीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी चिंता सतावत आहे. ती म्हणजे मधल्या फळीचं अपयश.
मधल्या फळीतल्या केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक या शिलेदारांना मोक्याच्या क्षणी मोठी खेळी उभारण्यात अपयश आलंय. त्यामुळे अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्ध अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. सुदैवानं मधल्या फळीची ही कसर गोलंदाजांनी भरुन काढली आणि इंग्लंडविरुद्धचा अपवाद वगळता टीम इंडियाला उर्वरित सामन्यात विजय साजरा करता आला.
केदार जाधवनं या विश्वचषकात 3 डावांत 80, धोनीनं सात डावांत 223, आणि हार्दिक पंड्याला सात डावांत 187 धावाच करता आल्या आहेत. धवनच्या दुखापतीनंतर लोकेश राहुलला सलामीला बढती मिळाली. पण त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या रिषभ पंतला मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे.
विश्वचषकाच्या रणांगणात रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहली ही आघाडीची फळी आपली कामगिरी चोख बजावताना दिसत आहे. म्हणूनच उपांत्य फेरीत या आघाडीच्या फलंदाजांना मधल्या फळीची साथ मिळणं तितकंच गरजेचं आहे.
त्यामुळे उपांत्य फेरीआधी मधल्या फळीच्या या प्रश्नावर भारतीय संघव्यवस्थापन काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
World Cup 2019 | विश्वचषकाच्या साखळीत टीम इंडियाचा अखेरचा सामना आज श्रीलंकेशी
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
06 Jul 2019 07:07 AM (IST)
श्रीलंकेचा संघ 1999 नंतर पहिल्यांदाच बाद फेरीआधीच गारद झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा औपचारिक सामना असला तरी विराटसेनेला मात्र उपांत्य फेरीच्या तयारीसाठी ही चांगली संधी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -