लंडन : टीम इंडियाच्या दुखापतग्रस्त शिलेदारांची यादी वाढत चालली आहे. शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांच्यापाठोपाठ या यादीत आता विजय शंकरच्या नावाची भर पडली आहे. भारतीय संघाच्या नेट्समध्ये बुधवारी फलंदाजी करताना जसप्रीत बुमराचा यॉर्कर विजय शंकरच्या तळपायावर आदळल्याने विजय शंकर दुखापतग्रस्त झाला आहे.


बुरराहचा चेंडू विजय शंकर लागला त्यावेळी तो वेदनेनं कळवताना दिसला. भारतीय संघव्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार विजय शंकरच्या दुखापतग्रस्त तळपायातील वेदना आता कमी झाल्या आहेत. पण भारतीय संघाच्या आजच्या नेट्समध्ये तो सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे विजय शंकरच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे.


विजय शंकरची एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात असून त्याने केवळ 10 सामने खेळले आहेत. या 10 सामन्यात त्याने 36 च्या सरासरीने आणि 96.77 च्या स्ट्राईक रेटने 180 केल्या आहेत. तर 4 विकेटही त्याच्या नावावर आहेत.


टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला मांडीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातील दोन सामन्यांमधून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान संघांमधील सामन्यात भुवनेश्वरच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले. त्यामुळे त्याला तिसरं षटक पूर्ण न करताच सामन्यातून माघार घ्यावी लागली.


तर सलामीवीर शिखर धवनलाही अंगठ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावं लागलं आहे. आधी तीन आठवड्यांसाठी शिखर धवन भारतीय संघाबाहेर असेल, असं सांगण्यात आलं होतं, मात्र दुखापत गंभीर असल्याने धवनला संपूर्ण विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. त्याच्या जागी रिषभ पंतला संघात कायमस्वरुपी स्थान मिळाले आहे. धवनच्या जागी आता केएल राहुल टीम इंडियाकडून डावाची सुरुवात करणार आहे.


VIDEO | World Cup 2019 | टीम इंडियाला मोठा झटका, दुखापतीमुळे शिखर धवन विश्वचषकातून बाहेर |