राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे पक्षाध्यक्षपदाच्या राजीनामा सोपवल्यापासून 26 दिवस उलटले आहेत. परंतु नवा काँग्रेस अध्यक्ष कोण असणार? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. नवभारत टाईम्स या वृत्तपत्राने अशोक गहलोत हे पुढील काँग्रेस अध्यक्ष होतील, अशी बातमी प्रसिद्ध केली. परंतु तूर्तास तरी पक्षात अशी कुठलीही हालचाल नसल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे. तसेच नव्या काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीत माझी कोणतीही भूमिका नसेल, हेदेखील राहुल यांनी स्पष्ट केले आहे.
अध्यक्षपदाचा प्रश्न भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसमोर होता. परंतु भारतीय जनता पक्षाने तातडीने जे. पी. नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमले, तसेच अमित शाह हेच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कायम राहणार अशी व्यवस्थादेखील करुन टाकली. परंतु काँग्रेसला अजूनही निर्णय घेता आलेला नाही.
अशोक गहलोत, ए.के.अँटोनी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काही इतर नव्या तरुण चेहऱ्यांची नावेदेखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. परंतु प्रत्येक नावाला काही मर्यादा असल्याने या निर्णयापर्यंत पक्ष पोहचलेला नाही. त्याचबरोबर 'गांधीच हवेत, तेच पक्षाचे तारणहार' हा जुना आलापही काही नेते गिरवत आहेत.
गहलोतांचे नाव आज काही माध्यमांमध्ये आले असले तरी या संदर्भातली कुठलीही हालचाल अजून पक्षामध्ये नसल्याचे सूत्रांनीदेखील सांगितले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडण्याची गहलोतांची बिलकुल इच्छा नाही. त्यामुळे पक्षाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत ठेवण्यामागे काही स्थानिक राजकारणी कारणीभूत आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
राहुल गांधी यांनी लोकसभेचे गटनेतेपद स्वीकारले नाही, आता ते अध्यक्ष म्हणून राजीनाम्यावरही ठाम आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल कशी असणार? हे पाहणे महत्वाचं असेल.