मुंबई : विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली, तेव्हापासून भारताचा ऑलराऊंडर केदार जाधव खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं. मात्र आता केदार जाधव विश्वचषकात खेळणार असल्याचं निश्चित झालं आहे, कारण तो पूर्णपण फिट असल्याची घोषणा टीम इंडियाच्या फिजिओनं केली आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात केदार जाधवच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे केदारच्या विश्वचषकात खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. मात्र केदारची दुखापत गंभीर नसल्याचं तेव्हाच समोर स्पष्ट झालं होतं. आता तो दुखापतीतूनही सावरला आहे. त्यामुळे निवड समितीने जाहीर केलेले सर्व खेळाडू आता इंग्लंडला रवाना होणार आहेत.
टीम इंडियाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी केदारची गुरुवारी फिटनेस टेस्ट घेतली त्यात त्याला फिट घोषित करण्यात आलं. आयसीसीच्या नियमानुसार 23 मे पर्यंत 15 खेळाडूंच्या संघात बदल करता येणार आहेत, मात्र टीम इंडियामध्ये आता बदल करण्याची गरज भासणार नाही. भारतीय संघ 22 मे रोजी इंग्लंडसाठी रवाना होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना
भारताला विश्वचषकातील सलामीचा सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे. त्याआधी 25 आणि 28 मे रोजी अनुक्रमे न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध सराव सामने होणार आहेत.
आणखी वाचा