गोवा : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभेच्या जागेवर आज (19 मे) रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान शांततेत पार पडावे यासाठी पणजी मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पणजी मतदारसंघातील सगळी मतदान केंद्रे दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ होईल अशी बनवण्यात आली आहेत.


काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत


अटीतटीच्या लढतीमुळे राज्याबरोबर देशाचे लक्ष पणजी पोटनिवडणुकीकडे लागले आहे. भाजपतर्फे सिद्धार्थ कुंकळ्येकर, काँग्रेसकडून बाबूश मोन्सेरात, गोवा सुरक्षा मंचतर्फे सुभाष वेलिंगकर, आपकडून वाल्मिकी नाईक यांच्या सह दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात असली तरी आपचे वाल्मिकी नाईक आणि गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर किती मते मिळवणार यावर भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे.


इंन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझामधील मतदान केंद्र विशेष असणार आहे. येथील सर्व 9 अधिकारी दिव्यांग असून तेच सर्व मतदान प्रक्रिया पार पाडणार आहेत.


पणजी पोटनिवडणुकीसाठी 30 मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. निवडणुकीच्या कामासाठी 150 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पणजीत 22 हजार 482 मतदार आहेत. यात 10 हजार 697 पुरुष व 11 हजार 785 महिला मतदारांचा समावेश आहे.


पणजीतील 30 पैकी 2 मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत. मतदानावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सर्व केंद्रांवर ऑनलाईन देखरेख ठेवली जाणार आहे.


अनामिकेला लावणार शाई


पणजी पोटनिवडणुकीसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या अंगठी घालण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बोटाला (अनामिका) शाई लावली जाणार आहे. लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून मतदारांच्या बोटाला शाई अजूनही असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.