लंडन : विराट कोहलीच्या युवा टीम इंडियाने 2008 सालच्या अंडर-19 विश्वचषकात उपांत्य फेरीतील सामन्यात केन विल्यमसनच्या संघावर मात अंतिम फेरी गाठली होती. योगायोगाची गोष्ट म्हणजे अकरा वर्षानंतर वन डे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत हेच दोन संघ पुन्हा एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे अकरा वर्षांनंतर ज्युनियर विश्वचषकाचं ते व्यासपीठ बदलून ते सिनियर विश्वचषकाचं झालं आहे. तसेच यावेळीही दोन्ही संघांचे कर्णधारही विराट कोहली आणि केन विल्यमसनच आहेत.


टीम इंडियाने विश्वचषकाच्या साखळी सामन्यात सात सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. तर न्यूझीलंडनं अकरा गुणांसह टॉप फोरमध्ये आपली जागा निश्चित केली. त्यामुळे आता मॅन्चेस्टरमध्ये हे दोन्ही संघ फायनलच्या तिकिटासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.


2008 च्या अंडर 19 विश्वचषकानंतर विराट आणि विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या अकरा वर्षात दोघांनीही आपापल्या संघांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. विराट कोहली धोनीकडून मिळालेला कर्णधारपदाचा वारसा यशस्वीरित्या पुढे चालवत आहे. तर केन विल्यमसन हा स्टीफन फ्लेमिंगनंतर न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. तेव्हा विश्वचषकाच्या रणांगणात हे दोन्ही कर्णधार समोरासमोर येतील तेव्हा निश्चितच तुल्यबळ लढतीची अपेक्षा राहिल.


उपांत्य फेरीत आघाडीची मजबूत फळी आणि प्रभावी आक्रमण ही विराटच्या टीम इंडियाची जमेची बाजू आहे. कर्णधार विराटसह रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने यंदाच्या विश्वचषकात धावांचा रतीब घातला आहे. फलंदाजांच्या या कामगिरीला भारतीय आक्रमणानेही तेवढीच मोलाची साथ दिली आहे. बुमरा, शमी आणि भुवनेश्वर या वेगवान आक्रमणासह यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या मनगटी फिरकीनं प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली आहे. हार्दिकची अष्टपैलू कामगिरीही टीम इंडियासाठी मोलाची ठरली आहे.


दुसरीकडे विल्यमसनच्या फौजेनंही सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. या संघात कर्णधार विल्यमसन, मार्टिन गप्टिल, कॉलीन मन्रो, रॉस टेलरसारख्या अनुभवी शिलेदारांचा समावेश आहे. तर ट्रेन्ट बोल्ट, मॅट हेन्री, जीमी निशाम आणि लॉकी फर्ग्युसन या किवी आक्रमणाने विश्वचषकाच्या मैदानात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतलं न्यूझीलंडचं आव्हान टीम इंडियासाठी नक्कीच सोपं नाही, याची जाणीव विराट आणि भारतीय संघव्यवस्थापनाला आहे.


भारत आणि न्यूझीलंड विश्वचषकाच्या इतिहासात आजवर सात वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात चार वेळा न्यूझीलंडने तर तीन वेळा भारताने बाजी मारली आहे. विजय-पराजयाचं हे समीकरण काहीसं न्यूझीलंडच्या बाजूनं झुकलेलं आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडिया हे समीकरण बरोबरीत सोडवून फायनलचं तिकीट मिळवणार? की विल्यमसन आणि कंपनी अंडर 19 विश्वचषकातल्या त्या पराभवाचा वचपा काढणार याचीच आता उत्सुकता आहे.