मॅन्चेस्टर : टीम इंडियानं मॅन्चेस्टरमध्ये वेस्ट इंडिजचा 125 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलं आहे. या सामन्यात टीम इंडियानं विंडीजला विजयासाठी 269 धावांचं आव्हान दिलं होतं.


मात्र विंडीजच्या फलंदाजांना टीम इंडियाने दिलेलं आव्हान पेलवलं नाही आणि त्यांचा डाव 35 व्या षटकात अवघ्या 143 धावांत आटोपला. मोहम्मद शमी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने केवळ 16 धावा मोजून चार फलंदाजांना माघारी धाडलं. जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी दोन विकेट्स काढून टीम इंडियाच्या या यशात मोलाचा वाटा उचलला.


त्याआधी, टीम इंडियाने 50 षटकांत सात बाद 268 धावांची मजल मारली. कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी भारतीय डावाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली. विराट कोहलीनं 82 चेंडूत आठ चौकारांसह 72 धावांची जबाबदार खेळी साकारली.


महेंद्रसिंग धोनीनं 61 चेंडूत नाबाद 56 धावांचं योगदान दिलं. धोनीच्या खेळीला तीन चौकार आणि दोन षटकारांचा साज होता. लोकेश राहुलनं 48 आणि हार्दिक पंड्यानं 46 धावांची खेळी उभारली.