मुंबई : राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरीत दिलेलं मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलं आहे. त्यानंतर मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळावं अशी मागणी सपा नेते अबू आझमी, काँग्रेस नेते अमीन पटेल आणि नझीम खान यांनी केली. अबू आजमी यांनी मुस्लीम आरक्षणासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.
मराठा समाजाप्रमाणे मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावं, असं न्यायालयाने म्हटलं होतं. मात्र त्यानंतरही हे बिल विधीमंडळात पास करण्यात आलं नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाप्रमाणे मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळायला हवं, अशी मागणी अबू आझमी यांनी विधानसभेत केली.
मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आंदोलन करत होता, त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे होतो. आता माझं मराठा समाजाला आवाहन आहे की त्यांनी आमच्या आरक्षणासाठी साथ द्यावी, असं खासदार इम्तियाज जलिल यांनी म्हटलं.
आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा सरकारचा निर्णय रद्द करताना उच्च न्यायालयाने मुस्लीम समाजाचं पाच टक्के आरक्षण मात्र वैध ठरवलं होतं. आज त्या मुस्लिमांकडे बघण्याची कुणाची इच्छा नाही. अनेक आयोग, कमिटी यांनी शिफारस करुनही मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न मात्र गांभीर्याने घेतला जात नाही, असा आरोप इम्तियाज जलिल यांनी केला.