बर्मिंगहॅम : टीम इंडियाने बर्मिंगहॅमच्या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी 315 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात भारतीय संघाने 50 षटकांत नऊ बाद 314 धावांची मजल मारली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीच्या जोडीने भारतीय डावाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली.


रोहित आणि राहुल यांनी 180 धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा भक्कम पाया घातला. त्यात रोहित शर्माचा वाटा 92 चेंडूंत 104 धावांचा होता. राहुलने 77 धावांची खेळी करुन त्याला छान साथ दिली. विराट कोहलीने 26, ऋषभ पंतने 48 आणि महेंद्रसिंग धोनीने 35 धावांची खेळी करुन भारताच्या डावाला मजबुती दिली.

रोहितचं विक्रमी शतक

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने बर्मिंगहॅममध्ये विक्रमी शतकाला गवसणी घातली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने शतक झळकावलं आहे. यंदाच्या विश्वचषकात रोहितचं हे चौथं तर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतलं 26 वं शतक ठरलं. या कामगिरीसह त्याने एकाच विश्वचषकात सर्वाधिक चार शतकं झळकावण्याच्या कुमार संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केली.

संगकाराने 2015 सालच्या विश्वचषकात चार शतकं ठोकली होती. त्याचबरोबर रोहितचं विश्वचषकाच्या इतिहासातलं आजवरचं हे पाचवं शतक ठरलं. विश्वचषकात सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्यांच्या यादीत तो आता रिकी पॉन्टिंग आणि संगकारासह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहा शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.

एकाच सामन्यात तीन विकेटकीपर

बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक सामन्यासाठी टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनी, रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक या तीन यष्टिरक्षकांना अंतिम अकरा जणांत खेळवण्याचा अनोखा निर्णय घेतला. भारताकडून वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यात एकाच वेळी तीन यष्टिरक्षक मैदानात खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघात धोनीसह पंत आणि कार्तिकचा संघात समावेश करण्यात आला. त्याशिवाय सलामीच्या लोकेश राहुलनेही आयपीएलमध्ये यष्टिरक्षण केलं आहे. त्यामुळे बांगलादेशच्या डावात भारतीय संघातून एकाचवेळी चार यष्टिरक्षक मैदानात दिसणार आहेत.