मुंबई : इंग्लंडने वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरुन नवा इतिहास रचला. 44 वर्षांत पहिल्यांदा इंग्लंडने विश्वचषक आपल्या नावे केला. इंग्लंडने विश्वचषक जिंकला असला तरी न्यूझीलंडचा पराभव झाल्याचं कोणाला मान्य नाही. रोहित शर्मा, युवराज सिंग, मोहम्मद कैश, गौतम गंभीर, ब्रेट ली, स्कॉट स्टायरिस या खेळाडूंनी आयसीसीच्या नियमावर नाराजी व्यक्त केली आहे.


बरोबरीत सुटलेला अंतिम सामन्यात आयसीसीच्या नियमांनुसार सर्वाधिक चौकार आणि षटकारांच्या निकषावर सुपीरिअर बाऊंड्री काऊंट नियमानुसार इंग्लंड विश्वचषकाचा विजेता ठरला. मात्र न्यूझीलंडचा पराभव अनेकांना मान्य नाही. क्रिकेटची माहिती असणारे आणि क्रिकेटप्रेमींनी इंग्लंडच्या विजयावर नाराजी व्यक्त केली आहे.


सर्वाधिक चौकारांच्या आधारावर इंग्लंड विजयी

न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना, इंग्लंडने 50 षटकात 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. यानंतर सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जोस बटलरने 15 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर 16 धावांचं लक्ष्य होतं. पण न्यूझीलंडला 15 धावाच करता आल्या आणि सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. मात्र सुपीरिअर बाऊंड्री काऊंट अर्थात सामन्याती सर्वाधिक चौकाराच्या आधारावर इंग्लंडने सामना जिंकत, विजेतेपदावर नाव कोरलं. इंग्लंडने या सामन्यात 26 तर न्यूझीलंडने 17 चौकार लगावले होते.

रोहित शर्मानेही याबाबत ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. रोहितने आयसीसीच्या नियमांवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. रोहितने ट्वीट करत म्हटलं की,"क्रिकेटमधील असे अनेक नियम आहेत की, ज्यांच्यावर गंभीरतेने चर्चा करण्याची गरज आहे."



मी आयसीसीच्या नियमांशी सहमत नाही. मात्र नियम नियम असतात. विश्वचषक जिंकल्याबद्दल इंग्लंडचं अभिनंदन. शेवटपर्यंत लढलेल्या न्यूझीलंडसोबत मी असल्याचं युवराज सिंगने म्हटलं आहे.





सुपीरिअर बाऊंड्री काऊंट नियम पचवणे कठीण आहे. निर्णय येईपर्यंत सुपर ओव्हर खेळवणे हा एक चांगला उपाय आहे. मात्र बाऊंड्री काऊंट नियमामापेक्षा दोन्ही संघांना विजयी घोषित करणं योग्य ठरलं असतं, असं माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने म्हटलं आहे.


भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही आयसीसीच्या नियमांवर नाराजी व्यक्त केली आहे.