मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेतली, तर तो काय करणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. धोनी निवृत्तीनंतर सैन्यात दाखल होण्याची शक्यता आहे. सैन्यात आव्हानात्मक पोस्टिंग मिळावी, अशी धोनीची इच्छा आहे. सैन्यात गेल्यावर सियाचीन सारख्या कठीण ठिकाणी पोस्टिंग मिळवून देशसेवा करायला आवडेल, असं धोनीच्या जवळच्या मित्राने सांगितलं आहे.


विश्वचषकात धोनीच्या कामगिरीबाबत अनेकांनी त्याच्यावर टीका केली. धोनीने विश्वचषकात संथ गतीने फलंदाजी केल्याचा फटका टीम इंडियाला बसला, असा आरोपही अनेकांनी केला. त्यामुळे धोनीने आता निवृत्ती घ्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. अशातच धोनीच्या एका जवळच्या मित्राने धोनीची देशसेवा करण्याची इच्छा असल्याची माहिती दिली आहे.


धोनी काही महिन्यात सियाचीनमध्ये पोस्टिंग मागू शकतो. धोनी स्वत: सैन्यातील अधिकाऱ्यांना त्याची इच्छा कळवणार असल्याचं त्याच्या मित्राने सांगितलं. भारतीय सैनिक ज्याप्रकारे देशसेवा करतात, तशी देशसेवा धोनीला करायची आहे. धोनी लवकरच या सर्व विषयांवर बोलण्यासाठी सैन्याशी संपर्क साधू शकतो, अशी माहिती धोनीच्या जवळच्या मित्राने दिली.


विश्वचषक आता संपला आहे. त्यामुळे धोनी निवृत्ती जाहीर करेल का? किंवा तसा धोनीचा विचार आहे का? यावर धोनीच्या मित्रांने सांगितलं की, त्याच्या डोक्यात काय सुरु आहे, हे ओळखणे कठीण आहे.



विश्वचषकात महेंद्रसिंह धोनीने 8 सामन्यात 273 धावा केल्या. अनेक सामन्यांमध्ये त्याने केलेली संथ फलंदाजी चिंतेचा विषय ठरली. सोशल मीडियावर त्याच्या संथ फलंदाजीवर अनेकांनी टीका केली. मात्र धोनीनी एवढ्यात निवृत्ती घेऊ नये, असं अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी म्हटलं. तसेच धोनीने निवृत्ती घेऊ नये, असं त्याच्या फॅन्सलाही वाटत आहे.


धोनीची सध्या भारतीय क्रिकेट संघाला गरज आहे, अशी अनेकांची भावना आहे. त्यामुळेच धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली त्यावेळी धोनीच्या समर्थनार्थ   हा हॅशटॅश सध्या ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये होता.


संबंधित बातम्या