सांगली : "भाजपाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही," असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्याचं हाळवणकर यांनी सांगितलं. सांगतील मिरजेत पार पडलेल्या एका मेळाव्यात हाळवणकर बोलत होते.


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत भाजपाचं शक्ती केंद्र प्रमुख आणि बुथ कमिटी प्रमुख मेळावा पार पडला. या प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने बुथ कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश हाळवणकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकदिलाने काम करण्याच्या सूचना दिल्या. तसंच आपल्या मतदारसंघात आपण भाजपाच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्र दिल्याचं सांगितलं.


यावेळी काही कार्यकर्त्यांनी हे ओळखपत्र दाखवल्यावर टोल नाक्यावरुन मोफत सोडले जात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावरुन सुरेश हाळवणकर म्हणाले की, "हे ओळखपत्र चालत नाही, हे आपल्याला माहित आहे. तरीही टोल नाक्यावरील कार्यकर्ते ओळखपत्र पाहिल्यावर त्यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्याने लफडं होऊ शकतं. आपला टोल काढून घेतला जाऊ शकतो. यामुळे आमदार, नेते आणि आणखी दोन कार्यकर्ते गेले म्हणून काय होतं, अशा विचारातून सोडून देतात."


आपण आपल्या मतदारसंघात 11 हजार भाजप कार्यकर्त्यांना ओळखपत्र दिले आहेत. ते तिकडे काय धुमाकूळ घालत असतील, हे मला समजत नाही, अशा शब्दात हाळवणकर यांनी भाजपच्या ओळखपत्राचा कसा फायदा होऊ शकतो, हे अभिमानाने सांगितलं. तसंच सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनाही त्यांच्या मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांना ओळखपत्र देण्याचा सल्ला दिला.