टॉन्टन : बांगलादेशनं वेस्ट इंडिजनं दिलेल्या 322 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून, विश्वचषकात सनसनाटी विजय साजरा केला. बांगलादेशनं विंडीजचं आव्हान सात विकेट्स आणि तब्बल 51 चेंडू राखून गाठलं. डावखुरा अष्टपैलू शाकिब अल हसन बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

त्यानं विंडीजच्या डावात दोन फलंदाजांना माघारी धाडलं आणि मग 99 चेंडूंत सोळा चौकारांसह नाबाद 124 धावांची खेळी उभारली. शाकिबनं लिटन दासच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 189 धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यात लिटन दासचा वाटा 69 चेंडूंत नाबाद 94 धावांचा होता. त्यानं आपली खेळी आठ चौकार आणि चार षटकारांनी सजवली.

तत्पूर्वी, शाय होप, शिमरॉन हेटमायर आणि एविन लेविसच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर विंडीजनं बांगलादेशसमोर 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे. शाय होपचं शतक अवघ्या चार धावांनी हुकलं. त्यानं 121 चेंडूत 96 धावांची खेळी उभारली. एविन लेविसनंही 70 धावांची खेळी करुन त्याला छान साथ दिली.

त्या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या शिमरॉन हेटमायरनं जलद 50 धावा फटकावल्या. त्यामुळे विंडीजला 50 षटकांत आठ बाद 322 धावांचा डोंगर उभारता आला.