Antim Panghal Won Bronze : भारताची महिला कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अंतिम हिने आपल्या सीनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पदार्पणात पदकावर नाव कोरलेय. ५३ किलो वजनी गटामध्ये अंतिम पंघाल हिने कांस्य पदकावर नाव कोरत 140 कोटी भारतीयांची मने जिंकली. अंतिम पंघालने यासोबतच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटाही मिळवला आहे. अंतिम पंघाल ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळवणारी पहिली कुस्तीपटू ठरली. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 53 किलो वजनी गटात पंघलने युरोपच्या जोआना माल्मग्रेन हिचा पराभव केला. 19 वर्षीय पंघाल जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी सहावी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. अंतिम पंघालआधी २०१२ मध्ये गीता फोगट, २०१२ मध्ये बबिता फोगट, २०१८ मध्ये पूजा धांडा, २०१९ मध्ये विनेश फोगट आणि अंशू मलिक यांनी जागतिक स्पर्धेत भारतासाठी पदके जिंकली आहेत.
सर्बिया येथील बेलग्रेडमध्ये आयोजित जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप (World Wrestlers Championship) स्पर्धेत अंतिम पंघाल हिने जोआना माल्मग्रेन हिला 16-6 अशा गुणांनी मात दिली. गतवर्षी माल्मग्रेन हिने 23 वर्षांखालील युरोपीय चॅम्पियनशिप आणि वरिष्ठ युरोपीय चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले होते. गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेत माल्मग्रेनला कांस्य पदकाच्या सामन्यात भारताच्या विनेश फोगाट हिने पराभूत केले होते.
अंतिम हिने विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतासाठी 23 वे पदक जिंकलेय. भारताने स्पर्धेत आतापर्यंत 23 पदके जिंकली आहेत. यामध्ये पाच सुवर्ण आणि १७ कांस्य पदकाचा समावेश आहे.
१९ वर्षीय अंतिमला उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. कलादजिंस्काया हिच्याकडून अंतिमला पराभूत व्हावे लागले. अटीतटीच्या लढतीत अंतिमला 4-5 ने पराभव स्विकारावा लागला. कलादजिंस्काया हिनेच टोकिया ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटलाही पराभूत केले होते. अंतिम पंघाल हिने उप-फेउपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या रोक्साना मार्ता जसीना हिला 10-0ने पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत रूसच्या नतालिया मालिशेवा हिला 9-6ने नमवले होते.