मुंबई : महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इंग्लंड आणि भारताचा महिला संघ एकमेकांशी या महामुकाबल्यात भिडणार आहे. पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवण्यासाठी कर्णधार मिताली राजच्या संघाने कंबर कसली आहे.


भारताने या सामन्यात विजय मिळवला तर तो विजय ऐतिहासिक असेल. कारण भारतीय महिला संघ पहिल्यांदाच विश्वविजेता होईल, जिथे भारतीय पुरुष संघही पहिल्यांदा विश्वविजेता बनला होता. लॉर्ड्सच्या मैदानातच 1983 साली भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजला हरवून पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याचा मान मिळवला होता.

सांगलीची स्मृती मानधना आणि मुंबईकर पुनम राऊत या सामन्यात सलामीला उतरणार आहेत. स्मृती मानधनाने सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये दमदार खेळी करुन भारताच्या विजयात महत्वाची भूमिका निभावलेली आहे. तर दुसरीकडे पुनम राऊतसह संपूर्ण भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे.

इंग्लंडचा टीम इंडियाने या विश्वचषकातील साखळी सामन्यांमध्येच 35 धावांनी पराभव केला होता. तर सेमीफायनलमध्ये सहा वेळा विश्वविजेता राहिलेल्या ऑस्ट्रेलिया संघालाही पाणी पाजलं. कर्णधार मिताली राजचं खेळीतील सातत्य, गोलंदाजांचा प्रभावी मारा आणि जबरदस्त फलंदाजी ही भारताची जमेची बाजू आहे.

झूलन गोस्वामी विक्रमापासून चार धावांनी दूर

भारतीय महिला संघाने यापूर्वी 2005 साली विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली होती. त्या संघातील खेळाडू झूलन गोस्वामी आज चार धावा करताच मोठा विक्रम नावावर करणार आहे. एक हजार पेक्षा जास्त धावा आणि शंभरपेक्षा जास्त विकेट घेणारी ती पहिलीची भारतीय महिला खेळाडू असेल.

हरमनप्रीतचा झंझावात

कोणत्याही गोलंदाजाच्या मनात धडकी भरेल, अशी खेळी हरमनप्रीत सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली. तिने या नॉक आऊट सामन्यात 171 धावा ठोकून भारताला विजय तर मिळवून दिलाच, शिवाय अनेक विक्रमही मोडीत काढले. नॉक आऊट सामन्यात सर्वाधिक धावा करणारी ती क्रिकेट विश्वातील पहिलीच फलंदाज ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्येही हा विक्रम कुणाच्या नावावर नाही.