डर्बी : कर्णधार मिताली राजच्या भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव करून, इंग्लंडमधल्या महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. या उपांत्य सामन्यात नाबाद 171 धावांची खेळी करणारी हरमनप्रीत कौर भारताच्या विजयाची प्रमुख शिल्पकार ठरली.


हरमनप्रीतच्या खेळीच्याच जोरावर भारताने 42 षटकांत 4 बाद 281 धावांची मजल मारली होती. एलिस विलानी, एलिस पेरी आणि अॅलेक्स ब्लॅकवेल यांच्या झुंजार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला 245 धावांची मजल मारता आली. मात्र भारताने दिलेलं आव्हान पेलता आलं नाही.

भारताच्या फलंदाजीनंतर गोलदाजांनीही साजेशी खेळी केली. दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 फलंदाजांना माघारी धाडलं. तर झूलन गोस्वामी आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारतीय महिला गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाची एकही फलंदाजी टिकू शकली नाही. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव 245 धावांवर आटोपला.

हरमनप्रीतचा झंझावात

हरमनप्रीत कौरच्या नाबाद 171 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं महिला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं.

या सामन्यात हरमनप्रीतने 115 चेंडूंत नाबाद 171 धावांची खेळी उभारून कमाल केली. तिचं वन डे कारकीर्दीतलं हे तिसरं शतक ठरलं. तिच्या शतकाला वीस चौकार आणि सात षटकारांचा साज होता.

हरमीनप्रीत 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकार ठोकत नाबाद 171 धावा ठोकल्या. तर व्ही कृष्णमूर्तीही 10 चेंडूत 16 धावा करुन नाबाद राहिली.

डर्बीतल्या या सामन्यात सलामीच्या स्मृती मानधना आणि पूनम राऊत स्वस्तात माघारी परतल्या. पण हरमनप्रीतनं कर्णधार मिताली राजच्या साथीनं 66 धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरला. मग तिनेच दीप्ती शर्माच्या साथीनं 137 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला मजबुती दिली