सोलापूर:  काऊ बॉय ऑफ सोलापूर..अर्जुन कदम.. वय... फक्त 90.. कदमांच्या आज्जानं गेल्या 84 वर्षांपासून चाकं पाहिलीच नाहीत.. त्याला पेट्रोलच्या दरवाढीनं काही फरकही पडत नाही.. कारण घोड्याचे चार पाय... हीच त्याची चाकं आहेत..आणि त्याचा चारा हेच त्याचं इंधन.


अर्जुन कदम हे सोलापूर जिल्ह्यातील जेऊर गावानजीक झरे या गावचे रहिवाशी. वयाची नव्वदवी गाठलीय, पण आजही ते त्यांच्या घोड्यावरुनच प्रवास करतात. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आजही शेतात काम करतात. शेळ्यांना, गाईला चारा आणणे, अशी अनेक कामं ते रोज करतात. इतकंच नाही तर शेतातील पालेभाज्या घोड्यावरुन जाऊन बाजारात स्वतः विक्री करतात.

अर्जुन कदम यांच्या घरी वडिलोपार्जित घोडे होते, वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी घोड्याची सवारी सुरु केली, ती आजपर्यंत सुरुच आहे.

पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने नसल्याने लोक घोड्यावरुन प्रवास करीत असत. काळ बदलत गेला तसे अनेकांकडे सायकल, दुचाकी, चारचाकी आल्या, पण अर्जुन आजाचा प्रवास घोडयावरुनच सुरु आहे.

आपल्या कामासाठी, नातेवाईकांच्या गावी, लग्नकार्य काहीही असो, अर्जुन आजा नेहमीच घोड्यावर सवारी करतात.

अर्जुनआजाकडं सध्या घोडी आहे. बुगडी तिचं नाव... आजाच्या लाडाची... आजा तिच्यावर स्वार झाला... की या थरथरत्या शरिरालाही वेग येतो.. आजा वाऱ्याशी स्पर्धा करतो...

बाजारातली खरेदी असो.. किंवा कुठला दौरा... आजाची स्वारी घोड्यावरीच. दररोज 25 ते 30 किलोमीटरची रपेट ठरलेलीच.

84 वर्षे झाली.. आज्जा या सवारीशिवाय जगूच शकत नाही.

बायको, दोन मुलं, नातवंडं.. असा गोतावळा... शेतात आजही आजाचा हात सफाईदारपणे चालतो...

काळाप्रमाणे माणसानं बदलायला हवं, असं म्हणतात... पण अर्जुन कदमांसारखी असतात काही अवली माणसं... जी फक्त आपल्या तत्वांवर जगतात.