पॅरिस : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालने यजमान फ्रान्सवर 1-0 अशी मात करुन युरो कपच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपद मिळवलं.


 

 

स्टेड दी फ्रान्समध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांना निर्धारित वेळेत गोल करण्यात अपयश आलं. पण अतिरिक्त वेळेत एडरने 109व्या मिनिटाला गोल झळकावून पोर्तुगालचा 1-0 असा विजय निश्चित केला.

 

 

खरंतर या सामन्यात फ्रान्सची रोनाल्डोला रोखण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. फ्रान्सच्या दिमित्री पायेटने सामन्याच्या नवव्या मिनिटाला रोनाल्डोला टॅकल केलं. पायेटने केलेलं टॅकल इतकं गंभीर होतं की रोनाल्डोला 24व्या मिनिटालाच सामना अर्धवट सोडावा लागला. यावेळी रोनाल्डोला आपले अश्रूही अनावर झाले होते.

 

 

पण पोर्तुगालच्या संघाने आपला कर्णधार म्हणजेच रोनाल्डोसाठी अखेरपर्यंत खिंड लढवली आणि युरो कप जिंकण्याचं रोनाल्डोचं स्वप्न पूर्ण केलं.

 

 

या सामन्यात पोर्तुगालचा गोलकीपर रुई पॅट्रिसियोने फ्रान्सची सात आक्रमणं थोपवून धरली. दरम्यान पोर्तुगालने फ्रान्सवर तब्बल 41 वर्षांनंतर मिळवलेला हा पहिला विजय ठरला.