जयपूर : राधा यादवने अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून सुपरनोव्हा संघाला वुमन्स ट्वेन्टी ट्वेन्टी चॅलेंजचे विजेतेपद मिळवून दिले. अंतिम सामन्यात मिताली राजच्या वेलोसिटी संघाने सुपरनोव्हाला 122 धावांचे आव्हान दिले होते. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर सुपरनोव्हाने हे आव्हान चार विकेट्स राखून पार केले.

अखेरच्या चेंडूवर एक धाव हवी असताना राधा यादवनं चौकार ठोकून सुपरनोव्हाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हरमनप्रीतने 37 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांसह 51 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.

तत्पूर्वी सुषमा वर्मा (32 चेंडूत 40) आणि अमेली करच्या (38 चेंडूत 36) अर्धशतकी भागिदारीच्या जोरावर वेलोसिटी संघाने 20 षटकांत सहा बाद 121 धावांची मजल मारली होती. सुपरनोव्हाजकडून ली तहुहूने चार षटकात 21 धावा देत 2 विकेट मिळवल्या.

122 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हरमनप्रीतच्या सुपरनोव्हाजची सुरुवात वाईट झाली. तहुहूने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर हेली मॅथ्यूजला बाद केले. त्याच षटकात तहुहूने डॅनियल वेटला शुन्यावर बाद करुन दुसरा धक्का दिला. अखेर सहाव्या क्रमांकावर मैदानात उतरलेल्या हरमनप्रीतने संघाला सावरले. नुसतेच सावरले नाहीतर विजयश्री खेचून आणली.