पुणे : पुण्यात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाईचं बडगा पोलिसांनी उचलला आहे. अशाच एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाकडून वाहतूक पोलिसांनी जवळपास 24 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.


पुण्यात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. वाहनचालकांच्या मोबाईलवर दंडाच्या रकमेची पावती वाहतूक पोलिसांच्या वतीने पाठवण्यात येते. परंतु याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांची संख्या मोठी आहे. मात्र आता अशा घटनांना आळा बसण्याची दाट शक्यता आहे. कारण अशाप्रकारचा दंड वसूल करण्यासाठी शहरात पोलिसांनी नाकेबंदी सुरु केली आहे. दंड थकवलेल्या अशा एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाकडून लष्कर वाहतूक पोलिसांनी चक्‍क 24 हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला.


वाहतूक पोलिसांनी पुणे शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. चौकाचौकात नाकाबंदी करुन ई-चलन मशिनवर वाहनचालकांकडील थकीत दंडाची रक्‍कम तपासली जात आहे. एखाद्या वाहन चालकाने दंडाची रक्‍कम भरली नसेल तर त्याच्याकडून संपूर्ण दंड वसूल करण्यात येत आहे.


लष्कर वाहतूक विभागातील पोलिस हवालदार मार्तंड जगताप यांनी गुरुवारी दुपारी नाकाबंदीत एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाला थांबवून माहिती घेतली. त्यावेळी त्या गाडीच्या चालकाने यापूर्वी पुणे-मुंबई एक्‍सप्रेस-वेवर तब्बल 24 वेळा स्पीड लिमिटचे उल्लंघन केल्याचे समोर आले. त्यापोटी प्रत्येक वेळी एक-एक हजार रुपये असा 24 हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. परंतु ती रक्‍कम भरली नव्हती. यावेळी ही संपूर्ण रक्कम त्याच्याकडून वसूल करण्यात आली आहे.


पुणे पोलिस आयुक्‍त डॉ. के व्यंकटेशम यांनीही कारवाईबद्दल पोलिस हवालदार मार्तंड जगताप आणि पुणे वाहतूक पोलिसांचे ट्‌वीटद्वारे अभिनंदन केले. तसेच, एप्रिल महिन्यात अपघाती मृत्यूचे प्रमाण 55 टक्‍क्‍यांनी घटले आहे. हे प्रमाण राज्याच्या तुलनेत चांगले आहे. सर्वजण वाहतुकीच्या नियमाचे पालन करून अपघाताचे प्रमाण कमी करूयात, असे आवाहन पोलिस आयुक्‍त के. वेंकटेशम यांनी केलं