कराची : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रातांत बंदरगाह शहरात ग्वादर येथे एका फाईव्ह स्टार हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. काही शस्त्रधारी दहशतवादी या हॉटेलमध्ये घुसले आहेत. हॉटेलमध्ये घुसल्यानंतर या हल्लेखोर दहशतवाद्यांना अंदाधुद गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.


डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, पर्ल कॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये तीन ते चार दहशतवादी घुसले. बलुचिस्तानच्या माहिती आणि प्रसार मंत्री जहूर बुलेदी यांनी एक्स्प्रेस ट्रिब्यूनला दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमधील सर्व विदेशी नागरिक आणि इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. पाकिस्तानी सैन्याला त्याठिकाणी पाचरण करण्यात आलं आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.


शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान पर्ल कॉन्टिनेन्टल हॉटेलवर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्याचं एका अधिकाऱ्यांनं सांगितलं. पीसी हॉटेल ग्वादरच्या कोह-ए-बाटिल डोंगरावर आहे. येथे पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. पोलिसांनी हॉटेलच्या आसपासच्या संपूर्ण भागाला वेढा घातल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिलं आहे.





ग्वादरच्या ओरमारा भागात 18 एप्रिलला पॅरामिलिटरी फोर्सच्या वेशात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी 7 बसमधून इतर प्रवाशांसोबत जात असलेल्या नौदल, हवाईदलाच्या 11 जवानांसह 14 जणांची हत्या केली होती. बलुचिस्तानमधील राज्यमार्गावर बसमधून बाहेर काढून या सर्वांची हत्या करण्यात आली होती.


अफगाणिस्तान आणि इराण यांच्या सीमेजवळ असलेला बलुचिस्तान प्रदेश पाकिस्तानातील सर्वात मोठा आणि सर्वात गरीब भाग आहे. चीन सीपेकच्या माध्यमातून बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.