लंडन : वर्ल्ड नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का बसला आहे. विम्बल्डनमध्ये जोकोविचचं आव्हान तिसऱ्याच फेरीत संपुष्टात आलं.

 
अमेरिकेच्या 28व्या मानांकित सॅम क्वेरीनं जोकोविचला हरवून यंदाच्या विम्बल्डनमधला सर्वात मोठा अपसेट नोंदवला. खरं तर कालच जोकोविच 7-6, 6-1 असा पराभवाच्या छायेत होता. पण त्यावेळी पावसानं व्यत्यय आणल्यानं सामना थांबवावा लागला.

 
दुसऱ्या दिवशी खेळ पुन्हा सुरु झाल्यावर जोकोविचनं तिसरा सेट जिंकून आपलं आव्हान काही काळ शाबूत ठेवलं. मात्र अखेर चौथ्या सेटमध्ये सॅम क्वेरीनं जोकोविचवर मात केली.

 
ही लढत 7-6, 6-1, 3-6, 7-5 अशी आपल्या खिशात टाकली. गेल्या वर्षीच्या विम्बल्डनपासून जोकोविच ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये अजिंक्यच होता. पण अखेर सॅम क्वेरीनं जोकोविचच्या वर्चस्वाला तडा दिलाय.